Jantar Mantar Protest | आसामात मंत्र्याची मुलगीच आंदोलनात

मंत्री केशब महंता यांना जबाबदार धरू नका : मुख्यमंत्री सरमा
Jantar Mantar Protest |
Jantar Mantar Protest | आसामात मंत्र्याची मुलगीच आंदोलनात
Published on
Updated on

गुवाहाटी; वृत्तसंस्था : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत गुवाहाटीमध्ये झालेल्या आंदोलनात आसामचे मंत्री केशब महंता यांच्या मुलीने सहभाग घेतल्याने राज्यात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंत्र्यांना किंवा त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करू नये, असे आवाहन केले आहे.

गुवाहाटीतील चाचल येथील अधिकृत आंदोलनस्थळी गुरुवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात होता. आंदोलनानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये मंत्री केशब महंता यांची मुलगी दिबिसा महंता आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, ‘‘माझी मुले काय बोलतात यासाठी मी कसा जबाबदार असू शकतो? माझा स्वतःचा भाऊही माझ्या अनेक मतांशी सहमत नसतो. माझी मुलेदेखील माझ्या अनेक विचारांशी सहमत नसतात. अनेक पत्रकार भाजपविरोधी भूमिका घेतात; पण त्यांचे पालक भाजप समर्थक असू शकतात.’’

दिबिसा महंता यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वक्तव्य केल्याबद्दल दुःख व्यक्त करताना सरमा म्हणाले, ‘‘मला संधी मिळाली तर मी तिच्याशी स्वतः बोलेन. मात्र यासाठी तिच्या वडिलांना त्रास देण्याचे कोणतेही कारण नाही. उद्या माझा मुलगाही माझ्या मतांविरोधात बोलू शकतो. तो पुढे वकील होईल आणि कदाचित मला न पटणाऱ्या लोकांची बाजूही न्यायालयात मांडेल. मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या कृतींसाठी पालकांना जबाबदार धरता येत नाही. तिने जे बोलले ते मला योग्य वाटत नाही; पण त्यासाठी तिच्या वडिलांना दोष देणे योग्य ठरणार नाही.’’

सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान : दिबिसा महंता

दिबिसा महंता यांनी नुकतेच युनायटेड किंगडममधून दोन पदव्युत्तर पदव्या पूर्ण केल्या आहेत. व्हायरल व्हिडीओंमध्ये त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईचा निषेध करताना दिसतात. एका व्हिडीओमध्ये त्या म्हणतात की, ‘‘विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करायचे होते. मात्र त्यांच्यावर लाठीमार, अश्रुधुराचा मारा करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. तरीही आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मला अभिमान आहे. त्यांच्या धैर्यामुळेच मीही येथे सहभागी झाले.’’ दरम्यान, मंत्री केशब महंता हे सध्या पूरस्थितीच्या मदतकार्यांमध्ये व्यस्त असून, त्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news