

नवी दिल्ली : राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी (दि.७) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्या पत्नी प्रतिमा शेलार आणि मुलगा ओमकार हे त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुर्मिळ पत्रांचे पुस्तक यावेळी शेलार कुटुंबाने पंतप्रधान मोदी यांना भेट दिले.
राज्यात मंत्री झाल्यावर पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर आलेल्या आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय माहिती आणि प्रसारण अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांचीही सदिच्छा भेट घेतली, अशी माहिती त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन दिली आहे.
विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. बुधवारी शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेणार असल्याचे समजते. यासोबतच ते इतर मान्यवरांच्याही भेटी घेणार असल्याचे समजते.