नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत राजीनामा देणार असल्याचे रविवारी (१५ सप्टेंबर) जाहीर केले. त्यानुसार ते मंगळवारी (१७ सप्टेंबरला) राजीनामा देण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी त्यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, आज (दि.१६) अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्यामध्येही एक महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी मुख्यमंत्रीपदी कोण, यावर चर्चा झाल्याचे समजते. त्या पाठोपाठ पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीचीही बैठक पार पडली.
आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक मंगळवारी (१७ सप्टेंबर) होणार आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल, दिल्ली सरकारमधील वरिष्ठ मंत्री अतिशी, मंत्री कैलास गेहलोत, मंत्री गोपाल राय, मंत्री सौरभ भारद्वाज अशा नावांची चर्चा आहे. मात्र अरविंद केजरीवाल महिला नेतृत्वाला संधी देतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. हरियाणा राज्यातील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊनही मुख्यमंत्री पदावर डाव खेळला जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मद्यधोरण गैरवहार प्रकरणात तुरुंगात होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दुसऱ्यांदा जामीन दिला, त्यांच्यावर आरोप झाल्याच्या सुरुवातीपासून भाजपसह दिल्ली काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. केजरीवाल मात्र राजीनामा न देण्यावर ठाम होते. तुरुंगातून सरकार चालवून दाखवू, असेही त्यांनी आपल्या विरोधकांना ठणकावून सांगितले होते. दरम्यान, १३ सप्टेंबरला केजरीवाल यांना जामीन मिळाला. रविवार, १५ सप्टेंबरला आपण पुढच्या दोन दिवसात राजीनामा देणार असल्याची मोठी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. त्यांच्या या घोषणाकडे राजकीय वर्तुळात अनेक अर्थांनी बघितले जाते. केजरीवाल यांना पुन्हा एकदा पहिल्या निवडणुकीप्रमाणे सहानुभूती मिळवून निवडणुकीला सामोरे जायचे आहे. मला सत्ता महत्त्वाची नसून लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे, लोकांची मते हेच विश्वासाचे प्रमाणपत्र, असा संदेश अरविंद केजरीवाल स्वतःच्या राजीनाम्यातून देण्याची शक्यता आहे. कारण लोकांनी म्हटल्याशिवाय आपण पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.