पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट होत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या आघाडीचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. तर हरियाणात भाजपने पुन्हा एकदा मुसंडी मारत सलग तिसर्यांदा सरकार स्थापनेकडे वाटचाल केली आहे. या दोन्ही राज्यांच्या निकालाची आम आदमी पक्षाचे निमंत्रक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी धास्ती घेती आहे. त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना या निकालानंतर एक सल्ला दिला आहे.
हरियाणात 'आप'ने 60 जागांवर निवडणूक लढवली होती. तर जम्मू-काश्मीरमध्ये 'आप'ने 8-9 जागांवर निवडणूक लढवली होती. केवळ जम्मू-काश्मीरमधील डोडा मतदारसंघात आम आदमी पक्षाचे उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे.
जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक निकालानंतर केजरीवालांनी आपला पक्षाला एक सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "निवडणुका जवळ येत आहेत. कोणत्याही निवडणुकांना गृहीत धरु नका. आजच्या निवडणुकीतील सर्वात मोठा धडा हा आहे की, कधीही अतिआत्मविश्वास ठेवू नये. प्रत्येक निवडणूक ही खडतर असते. , याची जाणीव ठेवा. कोणत्याही प्रकारची अंतर्गत लढाई होता कामा नये. या निवडणुकीत तुमची भूमिका सर्वात महत्त्वाची असेल, कारण आम्ही दिल्ली महानगरपालिका मध्ये आहोत. स्वच्छतेसारख्या मूलभूत गोष्टींची जनतेला अपेक्षा असते. आपापल्या भागात स्वच्छता राखली जाईल याची काळजी घेतली पाहिजे. असे केले तर निवडणूक जिंकणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी पक्षाला केले आहे.