

पुढारी ऑनलाईन न्यूज
आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी आज आपचेच नेते अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर कचरा फेकला. विकासनगर भागातील केजरीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर मालिवाल या कचऱ्याने भरलेले तीन टेम्पो घेऊन पोहचल्या होत्या. दिल्लीमध्ये कचरा उठावाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले आहेत त्याचा निषेध म्हणून खासदार स्वाती मालिवाल यांनी हे आंदोलन केले.
दरम्यान पोलिसांनी मालिवाल यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी पोलिस व मालिवाल यांच्यात झटापट झाली. मालिवाल यांनी पोलिसांचा निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारवर रोष व्यक्त केला त्या म्हणाल्या कचरा उठाव करण्यात सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. पूर्ण दिल्लीचे डंपिंग ग्राऊंड झाले आहे. त्या म्हणाल्या मी अरविंद केजरीवाल यांच्याशी बोलण्यासाठी आलो आहे. तसेच त्यांनी केजरीवाल यांना उद्देशून म्हटले की तुम्ही वेळेत सुधारला तर ठीक नाहीतर तुम्हाला जनताच सुधरवेल.
त्या पूढे म्हणाल्या आज दिल्लीचा कानाकोपरा घाण झाला आहे. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. गटारी, नाले तुंबले आहेत. यासाठी दिल्ली सरकारच जबाबदार आहे. विकासपूरीतील महिलांनी याबाबत तक्रार केली पण प्रशासन ढिम्म आहे. असाही त्यांनी आरोप केला. या सर्वाला केजरीवालच जबाबदार आहेत. केजरीवाल यांच्याच पक्षाच्या खासदाराने हे आंदोलन केल्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यामुळे मालिवाल या आता काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.