

नवी दिल्ली : दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नुतनीकरणाचा खर्च ३३.६६ कोटी असल्याचे कॅगच्या अहवालात नमूद आहे, असा दावा सोमवारी (दि.६) भाजपने केला आणि पुन्हा एकदा शीशमहल मुद्यावरून आम आदमी पक्षासह अरविंद केजरीवालांना लक्ष्य केले. तसेच दिल्ली सरकारने जाहिरांतीवर केलेला खर्च पाहता अरविंद केजरीवालांना आजपासून 'जाहिरात बाबा' म्हटले पाहिजे, अशीही टीका यावेळी भाजपने केली.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सोमवारी (दि.६) दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपवर जोरदार टीका केली. संबित पात्रा म्हणाले की, अरविंद केजरीवाल यांना आजपासून 'जाहिरात बाबा' म्हणायला हवे. दिल्ली सरकारने 'बिझनेस ब्लास्टर्स' योजनेसाठी एकूण ५४ कोटी रुपये खर्च केले. मात्र योजनेच्या जाहिरातीसाठी ८० कोटी रुपये खर्च केले, कॅगच्या माहितीनुसार या योजनेच्या जाहिरातीवरील खर्च हा योजनेच्या खर्चापेक्षा दीडपट अधिक आहे, असेही ते म्हणाले.
संबित पात्रा म्हणाले की, “कॅगच्या अहवालानुसार, १७ मार्च २०२० रोजी दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव दिला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत पाडून एक मजला जोडण्याचा प्रस्ताव दिला. एकाच दिवसात हा प्रस्ताव मान्य करण्यात आला. पुनर्बांधणीचा अंदाज ७.६१ कोटी रुपये होता. मात्र निविदा ८.६२ कोटी रुपयांची काढली. हेच काम २०२२ मध्ये ३३.६६ कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले. म्हणजे अंदाजित रकमेपेक्षा खर्च ३४२.३१% जास्त झाला, असेही संबित पात्रा यावेळी म्हणाले.