

नवी दिल्ली : दिल्लीतील मुलांचा गलिच्छ राजकारणासाठी वापर करायला कोणी शिकले असेल तर ते अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी आहेत. अरविंद केजरीवाल आणि अतिशी यांनी निरागस मुलांना राजकारणात ढकलले आहे, असा आरोप भाजपने केला. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये लहान मुलांचा एक समुह केजरीवालांना समर्थन करणाऱ्या घोषणा देत आहे. अरविंद केजरीवालांनीही हा व्हिडीओ शेअर केला.
भाजपने मंगळवारी आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आणि दिल्ली सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, केजरीवाल यांनी राजकीय फायद्यासाठी मुलांचा वापर केला. या माध्यमातून केजरीवालांनी स्वस्त आणि घाणेरडे राजकारण केल्याचा आरोपही भाटिया यांनी केला. भाटिया म्हणाले की, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली. तरीही सत्ताधारी आपने काही मुलांनी केजरीवाल यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याची पोस्ट समाज माध्यमांवरून काढली नाही. मुलांचे असे चित्रण हे बाल कायदा आणि निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आहे, असेही भाटिया म्हणाले.