

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी करण्याच्या चर्चेला येत्या काही महिन्यांत सुरुवात झाली तरी भारताला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर लष्करीदृष्ट्या अत्यंत सतर्क राहावे लागेल. चीनने सीमेवर अशा पायाभूत सुविधा उभारल्या आहेत, ज्यामुळे त्यांचे सैन्य मागे जाऊनही काही तासांत वेगाने आघाडीच्या चौक्यांवर परत येऊ शकते, असा इशारा लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिला आहे.
एका वरिष्ठ लष्करी अधिकार्याने एका मुलाखतीत सांगितले, चीनने गेल्या पाच वर्षांत पूर्व लडाखपासून अरुणाचलपर्यंत ज्या प्रकारे रस्ते, पूल, बोगदे आणि वसाहती उभारल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सैन्य 100-150 किलोमीटर मागे जाऊनही केवळ 2-3 तासांत पुन्हा सीमेवर परतू शकते.
गेल्या ऑक्टोबरमध्ये देपसांग आणि देमचोक येथील संघर्षस्थळांवरून सैन्य मागे घेतल्यानंतर परिस्थिती स्थिर झाली आहे. दोन्ही बाजूंच्या सैनिकांकडून समन्वित गस्तीमध्ये कोणताही अडथळा नाही. पण चीनची लष्करी तयारी आणि पायाभूत सुविधांचे बांधकाम थांबलेले नसल्याने आपण गाफील राहू शकत नाही, असे दुसर्या एका अधिकार्याने सांगितले.
गेल्या काही महिन्यांत चीनच्या काही ‘कम्बाइंड आर्म्स ब्रिगेड’ (उ-इ) ङ-उ पासून सुमारे 100 किमी मागे गेल्या असल्या तरी, अनेक ब्रिगेड अजूनही सीमेवरील संरक्षण रेजिमेंटसह आघाडीवर तैनात आहेत. प्रत्येक उ-इ मध्ये रणगाडे, चिलखती वाहने, तोफखाना आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली यांसारख्या शस्त्रास्त्रांसह सुमारे 4,500-5,000 सैनिक असतात.