'एएसआय' टीमच्या इशार्यानंतर संभलमधील उत्खननाला 'ब्रेक'
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेश राज्यातील बहुचर्चित संभलच्या चंदौसी परिसरातील प्राचीन पायरी विहिरीचे सुरू असलेले खोदकाम बंद करण्यात आले आहे. ही विहिरी प्राचीन आहे. त्यामुळे काही भाग केव्हाही कोसळू शकतो, असा इशारा देत खोदकाम करणाऱ्या मजुरांना उत्खनन केलेल्या जागेतून बाहेर येण्यास भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ( ASI विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
विहिरीच्या पायरीच्या आतील भिंत कमकुवत
'एएसआय' अधिकारी राजेश कुमार मीना यांनी उत्खननाची पाहणी केली. यानंतर कामगारांना सांगितले की, विहिरी असणार्या पायरीच्या आतील भिंती खूप कमकुवत झाल्या आहेत. कोणत्याही क्षणी त्या कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे आज कामगारांना दुसऱ्या मजल्यावर खोदकामासाठी आत जाण्यास मनाई करण्यात आली. उत्खननाचा आज १४वा दिवस हाेता.
काम करणे खूप आव्हानात्मक
बुधवारी (दि.१ जानेवारी ) ऐतिहासिक पायरी विहिरीच्या दुसऱ्या मजल्याचा दरवाजा २५ फूट खोल असल्याचे उघड झाले. यासोबतच 'एएसआय' टीमने सर्वेक्षण केले असता या बांधकामाच्या भिंती कमकूवत झाल्याचे दिसले. काेणत्याही क्षणी या भिंती कोसळू शकतात, असा इशारा देण्यात आला ऑक्सिजनच्या कमतरतेबरोबरच उत्खनन केलेल्या परिसरात उष्णता जाणवत आहे. अशा परिस्थितीत काम करणे खूप आव्हानात्मक बनले असल्याचे 'एएसआय' टीमने स्पष्ट केले आहे.
उत्खनन काम बंद
बुधवारी दुसऱ्या मजल्यावर वाळू खाली सरकत होती. त्यामुळे आज उत्खनन काम बंद करण्यात आले. भिंती तुटत आहेत. खाली ऑक्सिजनची कमतरता देखील आहे. आत गेल्यास उष्मा होतो, त्यामुळे अपघात होऊ शकतो.परिस्थिती पाहता. आता प्राचीन विहिरीच्या आत जाणे धोकादायक आहे, असेही 'एएसआय'ने स्पष्ट केले आहे.
संभलची प्राचीन विहीर
पायरी विहीर राजा आत्माराम यांनी १७२० मध्ये बांधली होती. ती अनेक वर्ष अज्ञात होती. या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. त्यावर कचऱ्याचा ढीग साचला होता. मागील १३ दिवस झालेल्या उत्खननात नवनवीन खुलासे होत आहेत. संभल शहरातील मोहल्ला लक्ष्मणगंज येथे सापडलेली ही पायरी विहीर 25 फुटांपर्यंत खोदण्यात आली आहे. या पायरी विहिरीचा वापर पूर्वी पाणी साठवण्यासाठी आणि सैनिकांच्या विश्रांतीसाठी केला जात होता.
