

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जगभरातील इंटरनेट युजर्स शुक्रवारी अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्रस्त झाले. अनेक नामांकित वेबसाईटस् आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स एकाच वेळी बंद पडले. क्लाऊडफ्लेअरची सेवा शुक्रवारी पुन्हा बंद पडल्याने ही समस्या उद्भवली. त्यामुळे जगभरातील वापरकर्त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’(पूर्वीचे ट्विटर) वर मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या.
कॅनव्हा आणि डाऊनडिटेक्टरसह अनेक मोठ्या सेवांवर या आऊटेजचा परिणाम झाला. अचानक वेबसाईटस् ठप्प झाल्याने लाखो युजर्सना मनस्ताप झाला. महत्त्वाची कामे अडून राहिल्याने सोशल मीडियावरून अनेकांनी याबाबत त्रागा व्यक्त केला.
ग्रो आणि झेरोधा सारख्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सनाही याचा फटका बसला. नंतर झेरोधाने स्पष्ट केले की, त्यांची काईट ही सेवा सुरू झाली आहे. काही युजर्सना ऑनलाईन पेमेंटस् करतानाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. युजर्सनी एक्स (पूवीर्चे ट्विटर) वरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या. अचानक इतक्या सेवा बंद कशा झाल्या? असा सवाल विचारला जात होता.
महिन्यात दुसर्यांदा सर्व्हर फेल
गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे अचानक अनेक वेबसाईटस् बंद पडल्या होत्या. त्यावेळीही क्लाऊडफ्लेअरच्या सर्व्हर्समध्ये बिघाड झाला होता. त्यावेळी स्पॉटीफाय, चॅटजीपीटी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्रुथ सोशल या प्लॅटफॉर्मसह अनेक सेवा बंद पडल्या होत्या.
नेटिझन्सची नाराजी
या अडचणीमुळे जगभरातील वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली.अनेकांनी ही समस्या वारंवार का उद्भवते असा सवाल केला, तर काहींनी क्लाऊडफ्लेअरच्या पुनरावृत्ती होणार्या अडचणींमुळे त्यांच्या कामात आणि व्यवसायांमध्ये अडथळे येत असल्याची तक्रार केली.
कंपनीचे स्पष्टीकरण
क्लाऊडफ्लेअरने आपल्या निवेदनात सांगितले की, त्यांच्या डॅशबोर्डशी संबंधित एपीआयमध्ये झालेली तांत्रिक समस्या दूर करण्यात आली आहे. या अडथळ्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये तब्बल 4.5 टक्क्यांची घसरण झाली.
क्लाऊडफ्लेअर का महत्त्वाचे?
क्लाऊडफ्लेअर हे जागतिक इंटरनेट पायाभूत सुविधांमधील एक महत्त्वाचे नाव आहे. हे वेबसाईटस्ला वेगवान लोड होण्यास मदत करते, तसेच सायबर हल्ल्यांपासून संरक्षण देते. वापरकर्ता आणि वेबसाईट यांच्यामधील मधला सुरक्षात्मक थर म्हणून काम करते. म्हणूनच क्लाऊडफ्लेअरमध्ये झालेल्या एका छोट्या समस्येमुळेही अनेक वेबसाईटस् एकाच वेळी ठप्प होऊ शकतात, जरी त्या एकमेकींशी संबंधित नसल्या तरी.