

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी मंडळाने फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती शनिवारी सूत्रांनी दिली. भारतीय हवाई दलासाठी राफेल खरेदी करण्याच्या कराराची ही पहिली पायरी आहे. सध्या हवाई दलाकडे मंजूर 42 स्क्वॉड्रन्सच्या तुलनेत केवळ 29-30 स्क्वॉड्रन्स उपलब्ध आहेत.
तथापि, वाटाघाटींसारख्या अनेक गोष्टींवर अद्याप चर्चा होणे बाकी असल्याचे सूत्रांनी नमूद केले. भारतीय हवाई दलाकडे सध्या 36 राफेल विमाने आहेत, जी 4.5 पिढीतील लढाऊ विमाने आहेत. आता हा प्रस्ताव संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील संरक्षण संपादन परिषदेसमोर ठेवला जाईल. तिथून मंजुरी मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीच्या संमतीची आवश्यकता असेल.
दरम्यान, रशियाचे पाचव्या पिढीतील लढाऊ विमान सुखोई सु-57 खरेदी करण्याचा प्रस्तावही अजूनही विचाराधीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. रशियाने या विमानाचे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याची ऑफर दिली असून भारताच्या सर्व अटी आम्हाला पूर्णपणे मान्य असल्याचे म्हटले आहे.
80 टक्के विमानांची भारतात निर्मिती
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन पुढील महिन्यात भारत दौर्यावर येत आहेत. फेब्रुवारीमध्ये होणार्या इंडिया-एआय इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान दोन्ही देश या करारावर स्वाक्षरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विविध मीडिया रिपोर्टस्नुसार, या करारात 80 टक्के राफेल विमाने भारतात बनवण्याची अट समाविष्ट असू शकते. या करारानुसार, 18 राफेल विमाने 2030 पासून तयार स्थितीत भारतात येतील; तर उर्वरित विमानांची निर्मिती स्वदेशी बनावटीने केली जाईल.