

विशाखापट्टणम (पीटीआय): भारतीय नौदलाने सोमवारी येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये आयोजित एका समारंभपूर्वक कार्यक्रमात ‘अंद्रोथ’ या दुसर्या पाणबुडीविरोधी शॅलो वॉटर क्राफ्टला ताफ्यात दाखल करून घेतले. ‘अंद्रोथ’च्या समावेशामुळे नौदलाची एकूण पाणबुडीविरोधी युद्ध क्षमता वाढणार आहे, विशेषतः किनारी आणि उथळ पाण्यातील मोहिमांसाठी ही नौका उपयुक्त ठरेल.
ईस्टर्न नेव्हल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, व्हाईस डमिरल राजेश पेंढारकर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. यावेळी वरिष्ठ नौदल अधिकारी आणि शिपयार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘अंद्रोथ’चे कार्यान्वयन हे नौदलाच्या स्वदेशीकरण आणि क्षमता वाढीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांमधील आणखी एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे ईस्टर्न नेव्हल कमांडच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोलकाता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडने या जहाजाची स्वदेशी बनावट केली आहे. यामध्ये 80 टक्क्यांहून अधिक स्थानिक उपकरणे वापरण्यात आली असून, हे जहाज भारताच्या वाढत्या जहाजबांधणी कौशल्याचे प्रतीक आहे.