

Anant Ambani 6 Crore Donation प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांनी सोमवारी वाराणसी येथे जाऊन काशी विश्वनाथ मंदिर आणि माता अन्नपूर्णा दरबारात विधिवत दर्शन व पूजन केले आहे. या दर्शन दौऱ्यादरम्यान अनंत अंबानी यांनी काशीच्या या दोन्ही प्राचीन धर्मस्थळांवर कोट्यवधी रुपयांचे भरीव दान अर्पण केले आहे.
या बाबत काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनासाठी आलेल्या अनंत अंबानी यांनी श्री काशी विश्वनाथ मंदिर न्यासाला ५ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. यानंतर त्यांनी मंदिर परिसरातीलच माता अन्नपूर्णा दरबारात जाऊन पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजा-अर्चा केली. यावेळी त्यांनी माता अन्नपूर्णा दरबारातही १ कोटी रुपयांचे दान अर्पण केले असल्याची माहिती समोर आली आहे. अनंत अंबानी यापूर्वीही अनेकदा बाबा काशी विश्वनाथ आणि माता अन्नपूर्णा देवीच्या दर्शनासाठी वाराणसीला आले आहेत.
सोमवार असल्याने काशी विश्वनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. अनंत अंबानी यांचा ताफा मंदिर परिसरातील गेट क्रमांक ४ बाहेर पोहोचताच त्यांचे फोटो काढण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना मंदिर परिसरात नेण्यात आले. यावेळी बाबा काशी विश्वनाथाचे दर्शन घेताना अनंत अंबानी अत्यंत भावविभोर आणि भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.