

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये संत सेवालाल महाराज यांची २८६ वी जयंती मोठ्या उत्साहात शुक्रवारी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ‘बंजारा कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय सभागृहामध्ये संत सेवालाल चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने ‘बंजारा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, बंजारा समाज हा संस्कृती आणि संस्कार जपणारा आहे. माझ्या कोटा लोकसभा मतदार संघात या समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात असून यांच्या प्रश्नांची मला जाण आहे. या समाजाच्या ज्या देशव्यापी अडचणी आहेत त्या दूर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल, असे प्रतिपादन त्यांनी केले. हा समाज देशभर कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतो, हे या समाजाचे गुण वैशिष्ट्य आहे, असे ते म्हणाले.
बंजारा समाजातील देशभरातील १४ कोटीपेक्षा अधिक लोक एकच गोर बोलीभाषा बोलतात, या बोलीभाषेचा समोवश संविधानातील ८ व्या अनुसूचीमध्ये करावा, अशी मागणी राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी कार्यक्रमामध्ये केली. बंजारा लोक देशभरातील कोणत्याही राज्यातील असतील तरी त्यांची बोलीभाषा गोर ही एकच आहे. ते आपआपसात गोर भाषेतच संवाद साधतात. त्यामुळे या भाषेला सांविधानिक दर्जा मिळावा, असे ते यावेळी म्हणाले.
सुप्रसिद्ध बँकर, गायिका म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ‘बंजारा कला रत्न’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांनी संत सेवालाल महाराज यांचे गुणगाण करणाऱ्या गाण्यांवर आधारित अल्बमध्ये ‘मारो दवे सेवालाल....’ हे गेय गीत गायले तसेच अभिनय ही केला. या कार्यक्रमात त्यांनी पांरपरिक वेशभूषा धारण केलेल्या महिलांसोबत नृत्यही केले. या कार्यक्रमात देशभरातील १५ राज्यातून बंजारा समाजातील लोक त्यांच्या पांरपारीक वेशभूषेत सहभागी झालेत. या कार्यक्रमात लोक गीत आणि लोकनृत्य लोक कलाकरांनी सादर केले.