Amit Shah vs Congress : ‘वंदे मातरम्’चे विभाजन करून काँग्रेसनेच घातला फाळणीचा पाया; अमित शहांचा घणाघाती आरोप

Amit Shah vs Congress : ‘वंदे मातरम्’चे विभाजन करून काँग्रेसनेच घातला फाळणीचा पाया; अमित शहांचा घणाघाती आरोप
Published on
Updated on

नवी दिल्ली : 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीतावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. काँग्रेसनेच १९३७ मध्ये लांगूलचालन आणि तुष्टीकरणाच्या राजकारणापोटी 'वंदे मातरम्'चे दोन तुकडे केले होते आणि त्यातूनच देशाच्या फाळणीचा पाया रचला गेला, असा थेट आरोप त्यांनी केला. देशाने 'वंदे मातरम्'च्या विभाजनाचे गंभीर परिणाम यापूर्वी भोगले असून आता जनता पुन्हा तशी चूक घडू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने काँग्रेस मुख्यालयात पूर्ण 'वंदे मातरम्' गायले गेले होते, त्यावेळी सोनिया गांधी काहीशा नाराज दिसल्या होत्या. त्यावर स्पष्टीकरण देताना काँग्रेस नेत्यांनी सांगितले होते की, मल्लिकार्जुन खर्गे बऱ्याच वेळेपासून उभे असल्याने त्या त्यांच्यासाठी खुर्ची मागवत होत्या. मात्र, या घटनेच्या अवघ्या चार दिवसांनंतर काँग्रेसने त्यांचे नेते 'वंदे मातरम्'चे केवळ दोनच कडवे गातील, अशी भूमिका जाहीर केली.

या निर्णयावर प्रहार करताना अमित शहा म्हणाले की, काँग्रेस कार्यकारिणीने घेतलेला हा निर्णय धक्कादायक आणि देशविरोधी आहे. पक्षाच्या १९३७ च्या ठरावाचा आधार घेत या महान राष्ट्रीय गीताची केवळ दोनच कडवी गाण्याचा घेतलेला निर्णय निषेधार्ह आहे. १९३७ मध्ये काँग्रेसने मुस्लीम तुष्टीकरणासाठी 'वंदे मातरम्'चे तुकडे करून देशाच्या विभाजनाची बीजे रोवली होती, ज्यातून द्वि-राष्ट्र सिद्धांताला बळ मिळाले आणि पुढे भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली, याची जाणीव त्यांनी संपूर्ण देशाला करून दिली.

काँग्रेसकडून हुतात्म्यांचा अवमान: अमित शहा

गृहमंत्री पुढे म्हणाले की, 'वंदे मातरम्'च्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ही ऐतिहासिक चूक सुधारण्याचे काम केले आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या अमर कृतीचे संपूर्ण गायन करून राष्ट्रीय एकात्मता अधिक बळकट करण्याचा आणि सर्व शासकीय कार्यक्रमांमध्ये ते पूर्ण गाण्याचा निर्णय घेत त्यास कायदेशीर चौकटही दिली आहे.

मात्र, काँग्रेसने घेतलेला निर्णय या कायदेशीर निर्णयाचा अवमान करणारा असून तो त्यांच्या घोर तुष्टीकरण धोरणाचीच साक्ष देतो. व्होट बँकेच्या स्वार्थासाठी काँग्रेसने केवळ बंकिमचंद्रांच्या अमर कृतीचाच अनादर केलेला नाही, तर 'वंदे मातरम्'चा जयघोष करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेल्या आणि तुरुंगवास भोगलेल्या लाखो हुतात्म्यांचाही घोर अपमान केला आहे.

काँग्रेस संसदेच्या कायद्याला नाकारत असल्याचा आरोप

काँग्रेस आज संसदेने पारित केलेल्या कायद्याला नाकारून स्वतःच्या पक्षाच्या १९३७ च्या जुन्या ठरावाला प्राधान्य देत असल्याचे नमूद करत अमित शहा यांनी आश्चर्य व्यक्त केले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा या देशात तुष्टीकरणाच्या राजकारणाला बळ देत असल्याचा आरोप त्यांनी केला.

'वंदे मातरम्'चे विभाजन होऊ देण्याची मोठी चूक देशाने एकदा केली होती आणि त्याचे भीषण परिणाम आपण भोगले आहेत, त्यामुळे आता जनतेने एकत्र येऊन काँग्रेसच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वातंत्र्याच्या ८० वर्षांनंतर आता देशात असे तुष्टीकरणाचे राजकारण चालणार नाही, असे सांगत भारतीय जनता पक्ष काँग्रेसच्या या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करत असून, रस्त्यापासून ते विधिमंडळ व संसदेपर्यंत या निर्णयाला जोरदार विरोध केला जाईल, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news