

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पाकिस्तान व नेपाळ सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची, मुख्य सचिवांची आणि पोलिस महासंचालकांची एक तातडीची बैठक घेतली.
ही बैठक भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकिस्तान-अधिकृत जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर घेतली जात आहे. ही कारवाई 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली.
ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली असून, यामध्ये जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक तसेच लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर सहभागी झाले. अमित शहा यांनी देशातील अंतर्गत सुरक्षा स्थितीचाही आढावा घेतला असून, वरिष्ठ सुरक्षा अधिकार्यांना सतर्क राहण्याचे आणि कडक नजर ठेवण्याचे निर्देश दिले.
गृहमंत्र्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ला पहलगाम येथील निर्दोष नागरिकांच्या क्रूर हत्येचे भारताकडून दिलेले प्रत्युत्तर म्हणून संबोधले. ते म्हणाले, भारतावर किंवा भारतीय नागरिकांवर हल्ला झाला, तर मोदी सरकार ठोस आणि योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी कटिबद्ध आहे. भारत दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी द़ृढसंकल्पी आहे.