Amit Shah | 2029 पर्यंत जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत दहशतवादमुक्त

मार्चअखेर माओवादी हिंसाचार संपवण्याचे लक्ष्य : शहा
Amit Shah | 2029 पर्यंत जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत दहशतवादमुक्त
Amit Shah | 2029 पर्यंत जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत दहशतवादमुक्त
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : 2029 पर्यंत जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातून दहशतवाद व बंडखोरी पूर्णपणे नष्ट करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी येथे केली. दिल्ली पोलिसांच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

शहा म्हणाले, 31 मार्च 2026 पर्यंत देश माओवादी हिंसाचारमुक्त करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि त्या दिशेने मोठी प्रगती झाली आहे. 2014 पूर्वी जम्मू-काश्मीर, ईशान्य भारत आणि माओवादी प्रभावित भागांमध्ये अंतर्गत सुरक्षेची गंभीर आव्हाने होती. मात्र आता सुमारे 80 टक्के समस्या नियंत्रणात आल्या असल्याचा दावा त्यांनी केला.

‘सेफ सिटी’ प्रकल्प व एआय कॅमेरे

दिल्ली पोलिसांसाठी ‘सेफ सिटी’ प्रकल्पांतर्गत 10,000 कॅमेर्‍यांचे जाळे उभारले जात आहे. यापैकी सुमारे 2,100 एआय सक्षम कॅमेरे लवकरच कार्यान्वित होतील. याशिवाय शहरात आधीच बसवलेले 15 हजार कॅमेरे सार्वजनिक सुरक्षेला अधिक बळ देतील. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एकात्मिक मुख्यालय दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. संसद हल्ला आणि लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोटासारख्या गुंतागुंतीच्या प्रकरणांचा यशस्वी तपास केल्याबद्दल त्यांनी दिल्ली पोलिसांचे कौतुक केले.

ईशान्येत शांतता करार, हजारो युवक मुख्य प्रवाहात

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर सुरक्षेची स्थिती सुधारत असल्याचे शहा यांनी नमूद केले. ईशान्य भारतात सुमारे 20 शांतता करार करण्यात आले असून 10,000 हून अधिक युवकांनी शस्त्रसामग्री सोडून मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे.

नवे फौजदारी कायदे, गुन्हेगारीवर कारवाई

सरकारने अलीकडेच तीन नवे फौजदारी कायदे लागू करून गुन्हे न्यायव्यवस्था आधुनिक करण्याचा प्रयत्न केला आहे. दोषी ठरवण्याचे प्रमाण 75 ते 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य असल्याचे शहा यांनी सांगितले. आसाम, हरियाणा आणि गुजरातमध्ये दोषसिद्धी दरात 20 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. सायबर दहशतवाद, अमली पदार्थविरोधी मोहीम आणि संघटित गुन्हेगारी मोडीत काढणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

* 2029 पर्यंत जम्मू-काश्मीर व ईशान्य भारत दहशतवादमुक्त करण्याची घोषणा.

* 31 मार्च 2026 पर्यंत माओवादी हिंसाचार पूर्णपणे संपवण्याचे लक्ष्य.

* दिल्लीसाठी 10 हजार कॅमेर्‍यांचा ‘सेफ सिटी’ प्रकल्प, 2,100 एआय कॅमेरे कार्यान्वित होणार.

* दोषसिद्धी दर 75-80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा सरकारचा निर्धार.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news