

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून बुधवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी शहा यांना महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीची आणि राज्य सरकार याबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहिती देऊन केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी केली. त्यावर, केंद्राकडून महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असे आश्वासन शहा यांनी दिले आणि केंद्र सरकार भक्कमपणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक गुरुवार, ८ ते रविवार, ११ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील विविध भागांचा दौरा करणार आहे. या पथकाकडून प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर केला जाणार आहे. राज्याचा प्रस्ताव आणि पथकाचा अहवाल याआधारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधींतर्गत मदतीबाबत निर्णय होणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी शहा यांच्यासोबत झालेल्या आपल्या भेटीत राज्य सरकारने केंद्राकडे पाठविलेल्या आगाऊ प्रस्तावाची प्रतही दिली. राज्यातील सुमारे ३२ जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असून जवळपास ८० टक्के तालुके दुष्काळाने बाधित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, उपग्रह प्रतिमांच्या निकषांबरोबरच पावसातील खंड, भूजल पातळी, पिकांचे नुकसान आणि प्रत्यक्ष पाहणी यासारख्या अन्य निकषांचाही विचार केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी नागपूर विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेमुळे नागपूर विमानतळासाठी आवश्यक असणारी संरक्षण विभागाची २७ एकर जागा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.