

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा-
हरियाणामधील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपने विधिमंडळ पक्षनेते निवडीची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाकडून अमित शाह यांच्यासह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांना हरियाणासाठी केंद्रीय निरीक्षक बनवण्यात आले आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये विधिमंडळ पक्षनेते निवडीसाठी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चूघ यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
हरियाणा विधानसभेत भाजपला तिसऱ्यांदा बहुमत मिळाले आहे. ९० जागा असलेल्या हरियाणामध्ये भाजपने ४८ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी नायाब सिंह सैनी यांची निवड निश्चित मानली जात आहे. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सैनी यांनी दिल्ली दौरा करत प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात होत्या.
गेल्या काही वर्षात काही राज्यांमध्ये भाजपने धक्कातंत्राचा वापर करत नवे चेहरे मुख्यमंत्री म्हणून पुढे आणले आहेत त्यामुळे हरियाणामध्ये पुन्हा एकदा नायाब सिंह सैनी यांना संधी मिळणार की भाजप धक्कातंत्राचा वापर करत नवा चेहरा देणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विशेष म्हणजे पक्षाने ही निवड करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना केंद्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली आहे.