

इटानगर; वृत्तसंस्था : काँग्रेसच्या दोन दशकांच्या सत्ताकाळात आसामच्या लोकसंख्येच्या रचनेत मोठा बदल झाला. राज्यातील सात जिल्ह्यांत तब्बल 64 लाख घुसखोरांचे वर्चस्व निर्माण झाल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. ही घुसखोरी थांबवण्याची क्षमता भाजपकडेच असल्याचे त्यांनी सांगितले. अरुणाचल प्रदेशात धेमाजी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
शहा म्हणाले की, धुबरी, बारपेटा, दरांग, मोरीगाव, बोंगाईगाव, नागाव आणि गोलपारा या सात जिल्ह्यांमध्ये पूर्वी घुसखोरांची संख्या नव्हती; मात्र काँग्रेसच्या कारकिर्दीत येथे 64 लाख घुसखोर स्थायिक झाले. लोकांनी स्वतः सीमेवर जाऊन घुसखोरी रोखण्याची गरज नाही. ही जबाबदारी मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखालील सरकार पार पाडेल; मात्र घुसखोरी रोखायची असेल, तर आगामी निवडणुकांत पुन्हा एकदा भाजपलाच सत्तेत आणा. सुमारे 1.26 लाख एकर जमीन कथित घुसखोरांच्या अतिक्रमणातून मुक्त केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी मिसिंग आदिवासी समुदायाचे कौतुक केले. त्यांच्या कष्टकरी संस्कृतीमुळेच आसाममध्ये घुसखोरांना शिरकाव करता आला नाही. तुम्हाला शस्त्र उचलण्याची गरज नाही. तुमची जीवनपद्धतीच घुसखोरीविरोधात ढाल ठरली आहे, असे ते म्हणाले. केंद्र सरकारने मिसिंग समुदायाशी संवाद साधण्यासाठी विशेष प्रतिनिधी नेमल्याची माहितीही त्यांनी दिली.
विधानसभेच्या 126 जागा असलेल्या आसाममध्ये मार्च-एप्रिल 2026 दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता असून, 2016 पासून सत्तेत असलेला भाजप तिसर्यांदा विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.