

पुढारी ऑनलाईन :
ओडिशाच्या रायगढा-मलकानगिरी-कोरापुट रेल्वे लाईनवर सोमवारी एक मोठा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, येथील सिकरपाई आणि भालुमास्का स्टेशनच्या मध्ये एका मालगाडीने ॲम्ब्युलन्सला धडक दिली. यानंतरही ट्रेन थांबली नाही आणि तब्बल १०० मीटर पर्यंत त्या ॲम्ब्युलन्सला घसटत नेले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. या ॲम्ब्युलन्समधून आठ रूग्ण डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी जात होते. यावेळी ही ॲम्ब्युलन्स रेल्वेच्या ट्रॅकवर अडकली, तेंव्हाच ट्रेन आली आणि हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी डोळ्यांच्या रूग्णालयाच्या ॲम्ब्युलन्समध्ये आठ रूग्ण बसले होते. हे सर्वजण डोळ्यांच्या अनंता आय हॉस्पिटलमध्ये सर्जरीसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत आशा कार्यकर्ताही उपस्थित होती. या दरम्यान रस्त्यात रेल्वे ट्रॅक पार करत असताना ॲम्ब्युलन्स रेल्वेच्या ट्रॅकवर अडकली. यावेळीच मालगाडी त्या ट्रॅकवर आली. तीने ॲम्ब्युलन्सला रूळावरून घसटतच पुढे १०० मीटर अंतरापर्यंत नेले. यावेळी सतर्क लोको पायलटने त्वरीत इमरजन्सी ब्रेक लावत रेल्वे रोखली. यामुळे मोठा अपघात टळला.
या अपघाताआधी ॲम्ब्युलन्समध्ये बसलेल्या सर्व रूग्ण आणि चालक अपघाताआधीच सुरक्षितपणे बाहेर पडले. ज्यामुळे कोणालाही इजा झाली नाही. या घटनेवर रेल्वेने स्पष्टीकरण जारी केले आहे. रेल्वेच्या म्हणण्यानुसार, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.