

चंदीगड ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्योगपती मित्र मुकेश अंबानी यांनी शेतकरी आणि सामान्य लोकांच्या हजारो कोटी रुपयांचा त्यांच्या पुत्राच्या लग्नात चुराडा केला, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. हरियाणा विधानसभेतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या 25 उद्योगपती मित्रांसाठी एक व्यवस्था तयार केली आहे. या उद्योगपतींना त्यांच्या मुलांच्या लग्नात हजारो कोटी रुपये खर्च करण्याची मुभा मोदी यांनी दिली आहे. हा पैसा शेतकरी आणि सामान्यांचा असून उद्योगपतींकडून या पैशाची वारेमाप उधळपट्टी केली जात आहे. शेतकरी आणि सामान्यांना मात्र त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.
अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांच्या जुलैमधील विवाह सोहळ्यात राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह बॉलीवूडमधील तारे-तारकांनी उपस्थिती दर्शविली होती. या नेत्र दिपवून टाकणार्या सोहळ्यात अंबानी यांच्याकडून गोरगरीब आणि सामान्यांच्या खिशातून काढून घेण्यात आलेल्या पैशाची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. हरियाणात 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे; तर 8 ऑक्टोबर रोजी निकाल आहे. दहा वर्षांपासून या राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे काँग्रेसकडून भाजपकडून सत्ता खेचून आणण्यासाठी रणनीती आखण्यात आली आहे.
यावेळी राहुल यांनी अग्निवीर योजनेवरूनही केंद्रावर हल्लाबोल केला. जवानांची पेन्शन, कँटीन आणि हौतात्म्याचा दर्जाही केंद्राने जवानांकडून हिरावून घेतला आहे, अशी टीकाही राहुल यांनी यावेळी केली.