Amarnath Yatra | १२५ लंगर, हजारो ड्रोन, २ लाख सुरक्षारक्षक तैनात

आजपासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेसाठी प्रशासन सज्ज
Amarnath Yatra |
Amarnath Yatra | १२५ लंगर, हजारो ड्रोन, २ लाख सुरक्षारक्षक तैनात
Published on
Updated on

अनिल साक्षी

जम्मू : यंदाच्या पवित्र अमरनाथ यात्रेला २ जुलैपासून औपचारिक सुरुवात होत असून, जम्मू येथून भाविकांचा पहिला जत्था रवाना होणार आहे. हवामान अनुकूल राहिल्यास या जत्थ्यातील भाविकांना ३ जुलै रोजी सायंकाळपर्यंत समुद्रसपाटीपासून सुमारे १४ हजार ५०० फूट उंचीवर बर्फापासून साकार झालेल्या पवित्र शिवलिंगाचे प्रथम दर्शन घेता येणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा, निवास, आरोग्य आणि भोजनाची व्यापक तयारी पूर्ण केली आहे.

साडेचार लाख भाविकांची नोंदणी

यंदा यात्रेसाठी सुमारे साडेचार लाख भाविकांनी नोंदणी केली असून, ऑन द स्पॉट नोंदणीची सुविधा सुरू झाली आहे. अधिकृत नियोजनानुसार दररोज १५ हजार भाविकांना पहलगाम आणि बालटाल या दोन मार्गांद्वारे यात्रेसाठी परवानगी दिली जाणार आहे.

निवास, भोजनाची व्यापक सुविधा

यात्रेदरम्यान भाविकांच्या सेवेसाठी लखनपूरपासून अमरनाथ गुहेपर्यंत १२५ हून अधिक लंगर स्वयंसेवी संस्थांकडून उभारण्यात आले आहेत. तसेच निवास, भोजन आणि इतर मूलभूत सुविधांचीही व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. यंदा ८ ते १० लाख भाविक यात्रेत सहभागी होतील, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

दोन लाखांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी धोक्याची शक्यता लक्षात घेऊन यंदा अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था आहे. लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस आणि जम्मू-काश्मीर पोलिसांसह दोन लाखांहून अधिक सुरक्षारक्षक यात्रेच्या संपूर्ण मार्गावर तैनात केले आहेत. पहलगाम आणि बालटाल ते अमरनाथ गुहा या मार्गांवर लष्कर व बीएसएफ स्थानिक पोलिसांना सहकार्य करणार असून, गुहेबाहेरील सुरक्षेची जबाबदारी आयटीबीपीकडे सोपविली आहे.

जम्मूत ५८ दिवस वाहतूक निर्बंध

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू शहरात पुढील ५८ दिवस विशेष वाहतूक निर्बंध (रोडबंदी) लागू करण्यात येणार आहे. बालटालसाठीचा यात्रेकरूंचा पहिला ताफा पहाटे ४ वाजता, तर पहलगामसाठीचा ताफा पहाटे ४.३० वाजता भगवतीनगर येथून रवाना होईल. ताफा सुटण्याच्या अर्धा तास आधी संबंधित मार्गांवरील वाहतूक बंद केली जाईल आणि ताफा पुढे गेल्यानंतर सुमारे दहा मिनिटांनी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. ही व्यवस्था संपूर्ण यात्राकाळात लागू राहणार आहे. याशिवाय, जम्मू–श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सकाळी ६ ते दुपारपर्यंतच वाहनांना परवानगी दिली जाईल. शहरात सहा ठिकाणी 'कटऑफ पॉईंट' केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news