

बंगळूर : अलमट्टीची उंची वाढवण्यावर कर्नाटक सरकार ठाम असल्यामुळे यावर सर्व संमती मिळवण्यासाठी केंद्र सरकारने चारही लाभार्थी राज्यांची 18 जूनला बैठक बोलावली आहे. केंद्रीय जलसंपदा मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक दिल्लीत होईल. तीत कर्नाटकासह महाराष्ट्र आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे प्रतिनिधी सहभागी होतील, अशी माहिती बंगलोरमध्ये सूत्राने दिली.
कर्नाटकाचे प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री आणि सिंचन मंत्री डी. के. शिवकुमार या बैठकीत सहभागी होतील. कृष्णा पाणी वाटप लवादाने 2013 साली कर्नाटकाची मागणी मान्य करत अलमट्टी धरणाची उंची 519 मीटर वरून 524 मीटर करण्यास अनुमती दिली आहे. केंद्र सरकारने अधिसूचना काढून या निर्णयाला संमती दिल्यास कर्नाटकाला अलमट्टीची उंची वाढवणे शक्य होणार आहे. त्यासाठी कर्नाटक सरकार आग्रही आहे. तथापि, सध्याच्याच पाणी साठ्यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरात महापूर येत असल्याचे कारण देत महाराष्ट्र सरकारने उंचीवाढीला विरोध केला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यानीही आपल्या वाट्याला कमी पाणी मिळाले असल्याचे कारण देत कृष्णा पाणी वाटप लवादाच्या निवाड्याला
सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे लवादाचा निर्णय अमलात आणायचा झाल्यास चारही राज्यांची संमती आवश्यक आहे. ती मिळवण्यासाठी पंतप्रधानाने मध्यस्थी करावी, असे आवाहन काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी केले होते. तसेच काही दिवसातच सर्वपक्षीय बैठक बोलावली जाईल, असेही सूचित केले होते.