

नवी दिल्ली : Congress News |दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५ उमेदवारांची पाचवी आणि २ उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली, या दोन्ही याद्यांसह काँग्रेसने सर्व ७० जागांसाठी उमेदवार जाहीर केले. दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव, माजी प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा, माजी खासदार संदीप दीक्षित हे प्रमुख उमेदवार काँग्रेसकडून मैदानात आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वच पक्ष यामध्ये ताकदीने उतरले आहेत. प्रमुख पक्ष असलेले आप, भाजप, काँग्रेस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि रामदास आठवले यांच्या रिपाईचेही काही उमेदवार दिल्ली विधानसभा निवडणुकीत आहेत.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने सत्ता मिळवली नसली तरी चांगले यश मिळवले. मात्र इंडिया आघाडी दिल्ली विधानसभेत एकत्रित नाही. इंडिया आघाडीतील काही घटक पक्षांनी दिल्लीत आम आदमी पक्षाला समर्थन दिले. मात्र इंडिया आघाडीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला इंडिया आघाडीतील एकाही पक्षाने अधिकृतपणे अद्याप पर्यंत समर्थन जाहीर केलेले नाही. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूक काँग्रेसला पूर्णतः स्वबळावर लढावी लागणार आहे.