पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातच्या पोरबंदर विमानतळावर ५ जानेवारी रोजी भारतीय तटरक्षक दलाचे एएलएच ध्रुव एमके III हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात ३ क्रू सदस्यांचा मृत्यू झाला. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ने दुहेरी इंजिन असलेल्या ध्रुव हेलिकॉप्टरची उड्डाणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांत दुसऱ्यांदा या हेलिकॉप्टरची उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
पोरबंदर येथे ५ जानेवारी रोजी झालेल्या अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईपर्यंत स्वदेशी बनावटीच्या दुहेरी इंजिन असलेल्या ध्रुव हेलिकॉप्टरचे उड्डाणे तात्पुरती थांबवावीत, असे हिंदुस्तान एरोनॉटिक्स (HAL) ने 'ध्रुव' हेलिकॉप्टरच्या (ALHs) सर्व ऑपरेटर्सना सांगितले आहे.
द टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दुर्घटनाग्रस्त तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या एफडीआर (फ्लाइट डेटा रेकॉर्डर) आणि सीव्हीआर (कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर) डेटाच्या प्राथमिक विश्लेषणातून असे दिसून आले आहे की ते क्रॅश होण्यापूर्वी पायलटांनी हेलिकॉप्टरवरील नियंत्रण गमावले होते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
जून २०२१ मध्ये एचएएलकडून दाखल झालेल्या ALH Mark-III हेलिकॉप्टरने ९० मिनिटांचे सराव उड्डाण पूर्ण केले होते. ५.५ टन वजनाच्या या हेलिकॉप्टरने २०० फूट उंचीवर घिरट्या घालत असताना पायलटांच्या नियंत्रण सूचनांना प्रतिसाद दिला नाही. परिणामी ते नंतर जमिनीवर कोसळले आणि त्याला आग लागली. या दुर्घटनेत कमांडंट सौरभ आणि डेप्युटी कमांडंट एस के यादव हे दोन्ही पायलट आणि एअर क्रू डायव्हर मनोज प्रधान नाविक यांचा मृत्यू झाला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमधील आणखी एका घटनेत पोरबंदरहून निघालेले ध्रुव हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले होते. यात तटरक्षक दलाचे दोन पायलट आणि एका एअरक्रू डायव्हरचा मृत्यू झाला होता.
५ जानेवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षा तपासणीसाठी सशस्त्र दलांनी त्यांच्याकडील सर्व ३३० एएलएच हेलिकॉप्टची उड्डाणे तात्पुरती थांबवली आहेत. २०२३ मध्ये ४ मोठ्या अपघातांनंतर संपूर्ण एएलएच ताफ्याला तांत्रिक तपासणीसाठी दोन-तीन वेळा जमिनीवर ठेवण्यात आले होते. अलिकडील काही महिन्यांत हेलिकॉप्टर्समधील वीज खंडित होणे आणि गियर बॉक्स निकामी झाल्याचेही आढळून आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.