फरिदाबाद (हरियाणा) ः दिल्ली बॉम्बस्फोटानंतर संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या हरियाणाच्या फरिदाबादेतील अल फलाह विद्यापीठातील प्रत्येक अधिकारी, कर्मचार्याकडे आता संशयाने पाहिले जात आहे. येथील एमबीबीएस शाखेचे विद्यार्थी ते विद्यापीठ व रुग्णालयातील डॉक्टरांची ‘एनआयए’ने झाडाझडती सुरू केल्याने विद्यापीठाचे कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही विद्यापीठात प्रवेश करणार्यांकडे संशयाने बघत आहेत.
फरिदाबादहून येणारा लांब रस्ता हळूहळू शेतातून वळत असताना, दुरून एक पांढरी इमारत दिसते. ते अल फलाह विद्यापीठ आहे. यश, समृद्धी आणि कल्याणाचे आश्वासन देणारे हे नाव. ‘अल फलाह’ या अरबी शब्दाचा अर्थच कल्याण, प्रगती आणि मोक्ष असा होतो. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून, या विद्यापीठात नीरव शांतता निर्माण झाली आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने अल फलाह विद्यापीठात प्रवेश करताच सुरक्षा रक्षकाने विद्यापीठात प्रवेश देण्यास मज्जाव करीत आमचीच झाडाझडती सुरू केली. डॉ. मुझम्मिल शकीलची अटक आणि लाल किल्ल्याजवळ डॉ. उमर-उन-नबी याने घडवलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण विद्यापीठ परिसरात स्मशान शांतता पसरली असल्याचे दिसते. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतसे अल फलाहशी संबंध येत राहिले. आता, 73 एकरच्या या विद्यापीठात पाऊल ठेवताना तुम्हाला पहिली गोष्ट जाणवते ती म्हणजे विद्यापीठात अंतर्बाह्य मोठा बदल झालेला आहे. बाहेर, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोहरीच्या शेतात पिवळी फुले वार्यावर डोलत आहेत. द़ृश्य सुंदर; मात्र उदासवाणी शांतता पसरली असल्याचे जाणवते आहे. येथील सुरक्षा रक्षक प्रत्येकाकडेच संशयाने बघत असल्याचे जाणवते. जणू काही इथे येणारा प्रत्येक गृहस्थ हा दहशतवादीच आहे.
‘तुम्हाला कोणाला भेटायचे आहे? तुम्ही का आला आहात?’ विद्यापीठ गेटवर पोहोचताच तुमच्यावर अशा प्रश्नांचा भडिमार केला जात आहे. जर तुम्ही रुग्णालयात जाणारे रुग्ण असाल, तर तुमच्यासाठी गेट उघडले जात आहे. मात्र, मीडियाला प्रवेश दिला जात नाही. कॅमेरा घेऊन आत जायचा तर प्रश्नच नाही. गेटवरील सुरक्षा रक्षकालादेखील मीडियाशी बोलण्यास मनाई आहे. विद्यापीठ गेटच्या आत, रस्ते आणि पार्किंग स्थळ रिकामे आहे. इमारतींच्या खिडक्या उघड्या असल्याने आतील चित्र दिसते; मात्र तिथेदेखील कोणीच दिसत नाही. जिथे एकेकाळी लॅब कोट विद्यार्थी इकडे-तिकडे धावताना दिसत होते. तिथे आता पायर्यांवर धूळ गोळा होत आहे. संपूर्ण परिसराचे निरीक्षण केल्यानंतर असे दिसते की, संपूर्ण कॅम्पस श्वास रोखून धरत आहे.
तेथील एका स्टेशनरी आणि किराणा दुकानाचे मालक तुषार गोयल यांनी सुरुवातीला बोलणे टाळले. त्यांच्या चेहर्यावर भीती, संकोच आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता; पण काही काळानंतर त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की, खरे सांगायचे तर... आम्हाला आधीच वाटले होते की, हे विद्यापीठ लवकरच किंवा काही वेळानंतर कोणत्यातरी वादात अडकेल. एवढे बोलून अचानक ते थबकतात आणि हळुवारपणे बोलायला सुरू करतात. आम्हाला कल्पना नव्हती की, स्फोट होईल; पण आम्हाला नक्कीच वाटले की, दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. लोक दूरदूरून उपचारांसाठी येथे येतात, गर्दी असते आणि वातावरण थोडे वेगळे असते, असे ते म्हणाले.
तुषार याचे कारण स्पष्ट करतात. सभोवतालची चार गावे - धौज, टिकरी खेडा, फतेहपुरी आणि सिरोही - सर्व मुस्लिमबहुल आहेत. रुग्णालयातही बहुतेक मुस्लिम डॉक्टर असतात. जेव्हा इतकी गर्दी असते, तेव्हा नेहमीच संघर्ष होण्याची शक्यता असते, असे ते म्हणाले. त्यांच्या डोळ्यांत भीतीपेक्षाही जास्त अनिश्चितता आहे. ग्राहक कमी झाल्याने दुकान चालवणे कठीण झाले आहे. जणू सर्व काही थांबले आहे. एकेकाळी दररोज हजारो रुपयांचा व्यवसाय असलेला व्यवसाय आता शेकड्यावर आला आहे.
विद्यापीठातून बाहेर पडताना, तुम्हाला प्रथम उजवीकडे एक छोटी बाजारपेठ दिसते. तिथे सहा-सात दुकाने आहेत. त्यात स्टेशनरी, नाश्त्याची दुकाने, मेडिकल स्टोअर्स, फळ विक्रेते आणि कटिंगची दुकाने आहेत; पण सध्या, या दुकानांची शटर बंद आहेत. फक्त तीन-चार दुकाने उघडी आहेत.