

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने अरुणाचल प्रदेशमध्ये झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भरीव यश मिळवले. अरुणाचल प्रदेशातील इटानगर महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. 20 सदस्यीय महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा लढवल्या होत्या. यामध्ये 3 जागा जिंकण्यात राष्ट्रवादीला यश आले.
सोबतच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये 4 जिल्ह्यांमध्ये 11 जागा देखील जिंकल्या आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायतमध्येही राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. याबाबत पक्षाचे ईशान्य भारत विभागाचे निरीक्षक संजय प्रजापती म्हणाले की, अरुणाचल प्रदेशात 28 जिल्हे आहेत.
आम्ही अरुणाचल प्रदेशातील 6 जिल्ह्यांमध्ये हे यश मिळवले आहे. या विजयाच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार आणि वाढ होण्यास मदत होईल. यामुळे पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळण्याच्या दृष्टीने आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे. 2026 मध्ये मेघालय आणि 2027 मध्ये मणिपूरमध्ये निवडणुका आहेत. या निवडणुकांचीही जोरदार तयारी सुरू आहे.