

नवी दिल्ली: प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाव, फोटो आणि व्यक्तिमत्त्वाचा परवानगीशिवाय व्यावसायिक हेतूंसाठी वापर करण्यास संकेतस्थळांना दिल्ली उच्च न्यायालयाने मनाई केली. प्रसिद्ध व्यक्तीच्या नाव, फोटो आणि इतर बाबींचा परवानगीशिवाय वापर करणे हे केवळ आर्थिक नुकसानच नाही तर त्यांच्या प्रतिष्ठेला आणि व्यक्तिमत्वाला हानी पोहोचवणारे आहे, असे न्यायालयाने म्हटले. ऐश्वर्या राय बच्चन यांच्या व्यक्तिमत्त्व आणि प्रसिद्धी हक्कांचे संरक्षण करण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले.
न्यायमूर्ती तेजस कारिया म्हणाले की, व्यक्तिमत्त्व हक्क म्हणजे एखाद्याच्या नाव, फोटो, आवाज, इत्यादी गोष्टींच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याचा मूलभूत हक्क आहे. परवानगीशिवाय या बाबींचा वापर केल्यास, त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचा आणि प्रतिष्ठेचा भंग होतो, असे न्यायमूर्ती कारिया यांनी आदेशात नमूद केले.
वरिष्ठ वकील संदीप सेठी यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, हे प्रकरण अतिशय धक्कादायक आहे. ऐश्वर्या राय यांच्या फोटोंचा, विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून अश्लील स्वरूपात गैरवापर केला जात आहे. बनावट फोटो तयार करून त्यांचा चुकीच्या हेतूंसाठी वापर होतो आहे. काही व्यक्ती अभिनेत्रीच्या नावाचा वापर करून पैसे उकळत आहेत. संदीप सेठी यांनी 'ऐश्वर्या नेशन वेल्थ' नावाच्या एका बनावट संस्थेचा उल्लेख केला. ऐश्वर्या राय बच्चन या कंपनीच्या मालक असल्याचा दावा संस्थेने केला आहे. प्रत्यक्षात या संस्थेबाबत ऐश्वर्या राय बच्चन यांना काहीच माहिती नाही. हा सरळसरळ फसवणुकीचा प्रकार आहे, असे सेठी यांनी सांगितले.
वकिलांच्या युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने आदेश दिले की, सदर संस्थांनी आणि व्यक्तींनी ऐश्वर्या राय बच्चन यांच्या नावाचा, फोटोचा किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित कोणत्याही बाबींचा अनधिकृत वापर करू नये. एआय निर्मिती, डीपफेक, फेस मॉर्फिंग इत्यादी तंत्रज्ञानाचा वापर करून ऐश्वर्या राय बच्चन यांच्या फोटो आणि व्हिडीओ तयार करण्यावर न्यायालायने बंदी घातली.
न्यायालयाने गुगल आणि एका प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला आदेश दिला की, याचिकेत नमूद केलेल्या सर्व संकेतस्थळांना ७२ तासांच्या आत हटवावे आणि संबंधित वापरकर्त्यांची माहिती न्यायालयाला सादर करावी. त्याचबरोबर सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला सदर संकेतस्थलांना ब्लॉक करण्याचे निर्देश देण्यात आले. सदर प्रकरणात ऐश्वर्या राय बच्चन यांच्यावतीने ज्येष्ठ वकील संदीप सेठी गुगलकडून ॲड. ममता राणी झा यांच्यासह इतर वकिलांनी बाजू मांडली. दरम्यान, अभिषेक बच्चन यांनीही आपल्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या उल्लंघनासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवरील सुनावणी अद्याप प्रलंबित आहे.