

पुढारी ऑनलाईन डेस्क: एअर इंडिया एअरलाईन्स पुन्हा एकदा लघवी कांडामुळे चर्चेत आली आहे. एअर इंडियाच्या दिल्ली-बँकॉक फ्लाईटमध्ये जपानी सहप्रवाशावर लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एअर इंडियाने भारतीय नागरी उड्डाण प्राधिकरण (DGCA) ला याबाबत माहिती दिली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने ANI ला दिलेल्या माहितीत, ही घटना बुधवारी 9 एप्रिल 2025 रोजी दिल्ली ते बँकॉक फ्लाइट AI2336 मध्ये घडल्याचे म्हटले आहे.
एअर इंडियाच्या माहितीनुसार 2D सीटवर बसलेला प्रवासी तुषार मसंद याने 1D सीटवर बसलेल्या ब्रिजस्टोन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर हिरोशी योशिजाने यांच्यावर मूत्र विसर्जन केले. हिरोशी यांनी सतर्कतेने क्रू सदस्यांना याची माहिती दिली.
त्यानंतर एअर इंडियाचे वरिष्ठ केबिन क्रू सदस्य सनप्रीत सिंग आणि ऋषिका मत्रे यांनी तत्काळ टॉवेल्स देऊन हिरोशी यांना सफाईसाठी मदत केली आणि मसंद याला पुढील अडचणी टाळण्यासाठी दुसऱ्या जागेवर हलवले.
हिरोशी यांना त्यांचा पोशाख बदलण्यासाठी क्रुने मदत केली तसेच या घटनेची माहिती कॅप्टनला दिली.
दरम्यान, 1F सीटवर बसलेल्या मॅथ्यू या प्रवाशाने सुरक्षिततेच्या कारणास्तव मसंद याला बिझनेस क्लास केबिन बाहेर काढण्याची मागणी केली. यावेळी लॅवेटरीला जाण्यापुर्वी मसंद याने हिरोशी यांची खूपदा माफी मागितली.
त्यानंतर हिरोशी यांनी तक्रार दाखल न करण्याचा निर्णय घेतला. तथपि, मसंद याला इशारा देण्यात आला आहे. तसेच त्याला बिझनेस क्लासमधून बाहेर काढून 14 सी ही सीट देण्यात आली.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, "एका प्रवाशाच्या असमर्थनीय वर्तनाचा प्रकार केबिन क्रूला कळविल्यानंतर क्रूने सर्व नियमांचे पालन केले आणि या प्रकरणाची माहिती DGCA ला दिली. आरोपीला इशारा देण्यात आला आहे.
हिरोशी यांना विमान उतरल्यानंतर बँकॉकमधील संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यासाठी एअर इंडियाने सांगितले. एअर इंडियाने म्हटले आहे की, स्वतंत्र समिती नेमून प्रवाशाविरूद्ध कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, नागरी उड्डयण मंत्री के. राममोहन नायडू यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मंत्रालय एअर इंडियाशी चर्चा करून या प्रकरणाचा तपास करेल आणि जर काही चुकले असेल तर, आम्ही आवश्यक ती कारवाई करू."
दरम्यान, यापुर्वी सन 2022 मध्ये एअर इंडियाच्या न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाईटमध्ये शंकर मिश्रा या प्रवाशाने एका 72 वर्षीय महिलेच्या अंगावर लघुशंका केली होती. तक्रारीनंतर चौकशी समिती बसवली गेली. समितीच्या अहवालानंतर एअर इंडियाने मिश्रा याच्यावर विमान प्रवासास 30 दिवस बंदी घातली होती.
मिश्रा याला अटकदेखील करण्यात आली होती. वेल्स फार्गो या अमेरिकेन बँकिंग फर्मनेही त्याला कामावरून काढून टाकले होते.