

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील चौधरी चरण सिंह आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडिया (Air India) फ्लाइट AI2845 मध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. हे विमान सकाळी 8:10 वाजता दिल्लीहून लखनौला पोहोचले. मृत प्रवाशाची ओळख आसिफुल्ला अंसारी म्हणून झाली आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टम अहवालानंतर स्पष्ट होईल.
विमान लखनौमध्ये पोहोचल्यानंतर क्रू मेंबर्सनी प्रवाशांना सीट बेल्ट काढून उतरायला सांगितले. मात्र, आसिफुल्ला अंसारी आपल्या सीटवर हालचाल न करता बसून राहिले. क्रू मेंबर्सनी त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला, पण ते कुठलाही प्रतिसाद देत नव्हते. डॉक्टरांना बोलावण्यात आले, त्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, विमान लँड झाल्यानंतरही त्यांनी सीट बेल्टही काढला नव्हता, त्यामुळे त्यांच्या प्रवासादरम्यानच मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या संशयास्पद मृत्यूमुळे पोलीस अधिक तपास करत आहेत. प्रवाशाची तब्येत आधीपासून बिघडलेली होती का किंवा प्रवासादरम्यान काही आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या का, हे शोधले जात आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून वैद्यकीय इतिहासाची माहिती घेतली जात आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.