पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातमध्ये बुधवारी (दि.२) रात्री भारतीय हवाई दलाचे विमान कसोळले. या दुर्घटनेत एक वैमानिक ठार झाला असून एकावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया फ्लॅटाफॉर्म Xवर पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हवाई दलाने म्हटलं आहे की, बुधवारी रात्री प्रशिक्षण मोहिमेदरम्यान गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळाजवळील एका गावात भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. वैमानिकांना विमानात तांत्रिक बिघाड लक्षात आला. त्यांनी विमानातून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यांनी एअरफील्ड किंवा स्थानिक लोकांचे कोणतेही नुकसान होणार नाही, याचीही खात्री केली. या दुर्घटनेत एका वैमानिकाला गंभीर दुखापत झाली. त्याचा मृत्यू झाला. एका वैमानिकावर जामनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पश्चिम बंगाल-हरियाणा येथे मागील महिन्यात झाले होते ७ मार्च रोजी, पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे हवाई दलाच्या एका वाहतूक विमानाचे अपघात झाले. तथापि, सुदैवाने या अपघातात AN-32 विमानातील सर्व क्रू मेंबर्स सुखरूप बचावले. यानंतर काही तास आधी, हरियाणातील पंचकुला येथील मोरनी येथील बलदवाला गावाजवळ भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान जग्वार कोसळले होते. या अपघातात वैमानिकाने पॅराशूटच्या साहाय्याने उतरून आपला जीव वाचवला. तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात झाल्याचे मानले जात आहे.
मागील काही काळापासून जग्वार लढाऊ विमानांच्या अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतीय हवाई दलात जॅग्वारचे अधिग्रहण १९७९ मध्ये सुरू झाले. ही जेट विमाने प्रामुख्याने जमिनीवरील हल्ल्यासाठी वापरली जातात. हवाई दलाकडे सुमारे १२१ जॅग्वार विमाने आहेत. २०३१ पर्यंत हळूहळू ती बंद करण्याची आणि त्याऐवजी एचएएलने बनवलेल्या तेजस एमके१एचा वापर करण्याची संरक्षण मंत्रालयाची योजना आहे.