

नवी दिल्ली : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) ने एनईएटी ४.० (नीट) पोर्टल सुरू केले आहे. नीट म्हणजेच नॅशनल एज्युकेशनल अलायन्स फॉर टेक्नॉलॉजी होय. एआयसीटीई आणि २२ खाजगी एडटेक कंपन्यांमध्ये भागीदारी झाली आहे. या भागीदारीनुसार ‘नीट’ च्या ऑनलाइन पोर्टलमध्ये सदर कंपन्या एआय आणि डेटा सायन्स सारख्या ४० अभ्यासक्रमांचा समावेश करतील. पोर्टलला भेट देऊन विद्यार्थी हे अभ्यासक्रम शिकू शकतात.
एआयसीटीईचे अध्यक्ष टी. जी. सीताराम यांच्या मते, पोर्टलवर या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थी त्यांचे कौशल्य वाढवू शकतील, ज्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यास मदत होईल. हा अभ्यासक्रम शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मात्र, कोणत्याही नोकरीची हमी अभ्यासक्रमांअंतर्गत नसेल.
दिल्लीतील एआयसीटीईच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात हा करार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेले टी. जी. सीताराम म्हणाले की, ‘नीट’ पोर्टलचा चौथा टप्पा सुरू झाल्यामुळे देशातील शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा होईल आणि ऑनलाइन शिक्षणात मोठे बदल होतील. नीट पोर्टलवर एआय टूल्सच्या वापरामुळे, विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत शिक्षणाचा लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना उद्योगाभिमुख कौशल्ये शिकता येतील, ज्यामुळे त्यांना नोकऱ्या मिळवणे सोपे होईल. पोर्टलची ऑनलाइन लिंक आहे, ज्यावर जाऊन विद्यार्थी उपलब्ध अभ्यासक्रमांशी संबंधित इतर माहिती मिळवू शकतात.
टीजी सीताराम म्हणाले की, ‘नीट ४.०’ च्या माध्यमातून दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उत्तम एडटेक सोल्यूशन्स मिळतील. बायोमेडिकल, अभियांत्रिकी, आरोग्य आणि निरोगीपणा, अवकाश तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांशी संबंधित एडटेक अभ्यासक्रम शिकण्याची संधी असेल. पोर्टलवर समाविष्ट केलेल्या एडटेक कंपन्यांच्या अभ्यासक्रमांचे दर २ ते ३ महिन्यांनी मूल्यमापन केले जाईल. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी ४ फेऱ्यांमध्ये ३०० हून अधिक मूल्यमापन केले, त्यानंतर २२ कंपन्यांच्या एकूण ४० नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांचा पोर्टलमध्ये समावेश करण्यात आला आहे.
एमिपो टेक्नोलॉजीज, एनसिस सॉफ्टवेअर, कल्चरलिजंस प्रायव्हेट लिमिटेड, ध्येय करियर मेंटर्स, एज वन इंटरनॅशनल, एलीट ईटू, फिलो एडटेक, फ्लेयरएक्स नेटवर्क्स, फ्रेमवर्क इंटरनेट, फ्यूचरमाइंड्स, हेल्थ एजुकेशन ब्यूरो, इंडो-यूरो सिंक्रोनाइजेशन, इंफोट्रॅक लाइब्ररी, इंटेलीपाट सॉफ्टवेअर, इंटरसेल टेक्नोलॉजीज, न्यू एडटेक स्किल्स, मेटीस एडूवेंचर्स, पोर्ट्रेनी स्किल्ड, स्किलडिजायर, आर्ट ऑफ लिविंग, टर्निप इनोवेशंस व वेल्थ विद्या सर्विसेज यांचा समावेश आहे.