Youth Congress president : एआय समिटमधील आंदोलनप्रकरणी युवक काँग्रेस अध्यक्ष उदय भानु चिब यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी

Uday Bhanu Chib
(Image source- X)
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या एआय समिटदरम्यान शर्टलेस आंदोलन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने सोमवारी हा आदेश दिला. दरम्यान, पोलिसांनी ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती मात्र न्यायालयाने ४ दिवसांची कोठडी मंजूर केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह राहुल गांधी युवक काँग्रेसच्या समर्थनात उतरले आहेत.

तपास गुन्हे शाखेकडे

या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या इंटर-स्टेट सेलमार्फत करण्यात येणार आहे. न्यायालयाने आदेश देताना तपास यंत्रणेला सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. या संदर्भात दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एआय समिटदरम्यान काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शर्टलेस आंदोलन केले. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींसमोर भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

तसेच, या आंदोलनाची आखणी करण्यात उदय भानु चिब यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला. काही आरोपी विविध राज्यांत असल्याने त्यांना ताब्यात घेण्यासाठी आणि पुरावे गोळा करण्यासाठी कोठडीची गरज असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावर चिब यांच्या वकिलांनी पोलिस कोठडीला विरोध दर्शवत, आरोपीने चौकशीसाठी सहकार्य केले असल्याचे नमूद केले. केवळ काही टी-शर्ट जप्त केल्याच्या कारणावरून दीर्घ कोठडी देणे योग्य नसल्याचे त्यांनी न्यायालयात मांडले.

युवक काँग्रेसच्या समर्थनात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी

या सबंध प्रकारावर बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, तरुण नेत्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र काँग्रेस घाबरणार नाही. देशातील तरुण नोकऱ्यांसाठी व्याकुळ आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमुळे पंतप्रधानांविरोधात रोष वाढला आहे, असा आरोप त्यांनी केला. अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारावर टीका करत त्यांनी दावा केला की या निर्णयामुळे शेतकरी आणि काही उद्योगांचे नुकसान होईल. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस संघर्ष करत राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तर शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक भारतीयाचा लोकशाही हक्क असल्याचे राहुल गांधी म्हणाले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निर्भयपणे देशहितासाठी आवाज उठवला असून त्यांचा अभिमान वाटतो, अमेरीकेसोबत झालेल्या करारामुळे देशहिताशी तडजोड झाल्याचा आरोप करत, या मुद्द्यावर आवाज उठवल्यामुळेच युवक काँग्रेसच्या अध्यक्षांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ता सत्य बोलणाऱ्यांना घाबरते मात्र आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत ठाम उभे आहोत,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

युवक काँग्रेसच्या कार्यालयाला छावणीचे स्वरूप

युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक केल्यानंतर युवक काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दिल्लीस्थित युवक काँग्रेसच्या मुख्यालयात एकत्र येत उदय भानू चिब यांना मुक्त करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासाठी युवक काँग्रेस कार्यालय परिसरात जोरदार निदर्शने केली जात आहेत. हे सुरू असताना युवक काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेरही पोलिसांची मोठी गर्दी आहे. या मुख्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news