

India e-commerce AI growth
नवी दिल्ली : भारतात ई-कॉमर्सचा (ऑनलाईन व्यापार) विस्तार करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान खूप मदत करेल. शिप्रॉकेटमुळे आतापर्यंत सुमारे ४ लाख व्यवसाय ऑनलाईन सुरू झाले आहेत. यामुळे देशातील सूक्ष्म आणि लघू उद्योगातील (MSMEs) तब्बल ६ कोटी छोट्या व्यापाऱ्यांना ऑनलाईन व्यवसायाची संधी उपलब्ध होईल. तंत्रज्ञानामुळे व्यवसायातील अडचणी कमी होतील आणि हे छोटे व्यापारी देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेशी जोडले जातील, असा विश्वास शिप्रॉकेट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) साहिल गोयल यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये 'एएनआय'शी बोलताना व्यक्त केला.
"शिप्रॉकेटने आतापर्यंत ४ लाख व्यवसायांना ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणले आहे, पण भारतात अजूनही ६ कोटी छोटे व्यापारी (MSMEs) आहेत ज्यांना ऑनलाइन यायचे आहे. खरोखरचे यश तेव्हाच मिळेल, जेव्हा देशाच्या एका कोपऱ्यातील व्यापारी दुसऱ्या कोपऱ्यातील ग्राहकाला सहज माल विकू शकेल. उदाहरणार्थ, गुवाहाटीमधील व्यापाऱ्याला काश्मीरमधील ग्राहकाला काही मिनिटांतच वस्तू विकता आली पाहिजे. हे AI मुळे शक्य होईल. तसेच यामुळे व्यापाऱ्यांसाठी ऑनलाइन व्यवसाय करणे अधिक सोपे करू शकतो.", असेही गोयल यांनी सांगितले.
पुढील १० वर्षांत किमान २ कोटी (२० दशलक्ष) छोट्या व्यापाऱ्यांना डिजिटल व्यासपीठावर आणण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.मोठ्या कंपन्या जे प्रगत तंत्रज्ञान वापरतात, तेच तंत्रज्ञान आता भारतातील वाढत्या ब्रँड्सना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यामध्ये AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) सर्वात महत्त्वाची भूमिका बजावेल. परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता भारताने स्वतःची AI यंत्रणा विकसित करणे आवश्यक आहे, अशी अपेक्षाही गोयल यांनी व्यक्त केली.
"ऑनलाईन व्यापार, कुरिअर आणि पेमेंट क्षेत्रातील सर्व कंपन्यांनी आपली माहिती (डेटा) एकाच ठिकाणी जमा करावी. या सामायिक माहितीचा वापर करून आपण भारतासाठी अधिक चांगले, सुरक्षित आणि शक्तिशाली तंत्रज्ञान बनवू शकतो, असेही गोयल यांनी यावेळी स्पष्ट केले.
"तंत्रज्ञान सोपे झाल्यामुळे नवनवीन लोक व्यवसायात येतील, ज्यामुळे लॉजिस्टिक्स (माल वाहतूक) आणि गोदामांच्या कामात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण होतील. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) काही कष्टाची किंवा एकाच प्रकारची कामे स्वतः करेल, पण यामुळे कामगारांच्या नोकऱ्या जाणार नाहीत. उलट, त्यांचे ५० टक्के काम हलके होईल. त्यामुळे कर्मचार्यांना अन्य महत्त्वाची कामे करण्यासाठी वेळ मिळेल. परिणामी, कामगारांची क्षमता वाढेल आणि कंपन्यांचा फायदाही होईल," असा विश्वासही गोयल यांनी व्यक्त केला.