

Sadhguru AI misuse deepfake case Isha Foundation personality rights Delhi High Court
नवी दिल्ली : ईशा फाउंडेशनचे संस्थापक सध्गुरु उर्फ जग्गी वासुदेव यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण मागण्यासाठी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) गैरवापराविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायमूर्ती सौरभ बॅनर्जी यांनी प्राथमिक सुनावणी घेत अंतरिम आदेश राखून ठेवला असून तो लवकरच प्रसिद्ध होणार आहे.
सध्गुरु यांचे वकील म्हणाले की, सद्गुरुंच्या नावाने आणि प्रतिमेचा वापर करून विविध उत्पादने बेकायदेशीरपणे विकली जात आहेत. तसेच, काही "Rougue" (फसव्या) वेबसाईट्स त्यांच्या प्रतिमेचा आणि नावाचा गैरवापर करत आहेत. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी डायनॅमिक इन्जंक्शन जारी करावे, अशी मागणी करण्यात आली.
सध्गुरु यांनी दाखल केलेल्या याचिकेत असा आरोप आहे की, त्यांच्या नावाचा, प्रतिमेचा, आवाजाचा आणि इतर वैशिष्ट्यांचा अनधिकृत वापर त्यांच्या ओळखीचा गैरफायदा घेण्याचा प्रकार आहे.
हे त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचा आणि प्रसिद्धीच्या अधिकाराचा भंग करणारे आहे. या कृतीमुळे त्यांच्या नावाचा वापर चुकीच्या प्रकारे एखाद्या संमतीशिवाय जाहिरातीसाठी किंवा उत्पादन/सेवांच्या प्रचारासाठी केल्याचे भासवले जात आहे.
या याचिकेत एक गंभीर आरोप करण्यात आला आहे की, एआय टूल्सचा वापर करून सध्गुरुंच्या आवाजाचे आणि भाषणांचे डीपफेक व्हिडिओ तयार केले जात आहेत. या व्हिडिओंचा उद्देश आर्थिक फसवणूक करणे, खोट्या उत्पादनांची विक्री, किंवा सोशल मिडियावर बनावट प्रेरणादायी भाषणांद्वारे प्रसिद्धी मिळवणे आहे.
याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, "या बनावट सामग्रीचा हेतू आर्थिक घोटाळा करणे, चुकीची माहिती पसरवणे, आणि सध्गुरु यांच्या प्रभावाचा बेकायदेशीर फायद्या घेणे हा आहे."
या प्रकरणात सध्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावतीने साईकृष्णा अॅण्ड असोसिएट्स या कायदेशीर संस्थेचे वकील – साईकृष्णा राजगोपाल, दीपिका पोखरिया, अंगद एस मक्कर, दिशा शर्मा आणि पुष्पित घोष यांनी बाजू मांडली.
सद्गुरूंच्या नावे एआय द्वारे बनावट ऑडिओ, व्हिडिओ आणि प्रतिमा तयार करून त्यांच्या सद्भावनेचा आणि लोकप्रियतेचा वापर करून विविध उत्पादने विकण्यासाठी आणि सबस्क्रायबर मिळवण्यासाठी प्रसारित करून फसवणूक होत असल्याची तक्रार अनेक सोशल मिडिया वापरकर्त्यांनी केली होती.