

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून सेवा बजावणाऱ्या तरुणांसाठी विवाहाबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. अग्निपथ योजनेत बदल केल्यानंतर आता दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ निवडणार्या अग्निवीरांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाह करता येऊ शकणार आहे.
नौदलाने यासंदर्भात अधिकृत आदेशही जारी केले आहेत. तसेच लष्कर आणि हवाई दलाकडूनही आपापल्या नियमांनुसार निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अग्निपथ योजनेच्या जुन्या नियमांनुसार अग्निवीरांना चार वर्षांच्या सुरुवातीच्या सेवेदरम्यान विवाह करण्याची परवानगी नव्हती. परंतु, आता दोन वर्षांचा अतिरिक्त कार्यकाळ (सेकंड टूर ऑफ ड्यूटी) निवडणाऱ्या अग्निवीरांना ही सवलत दिली जाईल. मात्र, यासाठी त्यांना मुदतवाढीच्या काळात निर्धारित केलेले सुरुवातीचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागेल. प्रशिक्षण संपल्यानंतर ते ठरवून दिलेल्या सुट्ट्यांमध्ये विवाह करू शकतील.
पहिल्या तुकडीची ४ वर्षे होणार पूर्ण
अग्निपथ योजनेच्या पहिल्या तुकडीत भरती झालेल्या सुमारे २४ हजार ४०० पैकी सुमारे १८ हजार ३०० अग्निवीरांचा चार वर्षांचा कार्यकाळ ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. ही संख्या पहिल्या तुकडीच्या ७५ टक्के आहे. योजनेच्या जुन्या तरतुदींनुसार चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर २५ टक्के अग्निवीरांना गुणवत्तेच्या आधारावर नियमित सैनिक म्हणून पुढील १५ वर्षांपर्यंत सेवेची संधी मिळणार होती, तर ७५ टक्के अग्निवीरांना सेवेतून मुक्त केले जाणार होते.
२०२६च्या भरतीचा अंतिम निकाल जाहीर
भारतीय लष्कराने अग्निवीर भरती २०२६ चा अंतिम निकालही जाहीर केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic.in वर जाऊन आपल्या ARO च्या निवड यादीत नाव किंवा रोल नंबर पाहू शकतात. या भरतीमध्ये जीडी, टेक्निकल, ट्रेडस्मन, ऑफिस असिस्टंट आणि इतर पदांचा समावेश आहे.
सेवा कालावधी वाढला
‘सेकंड टूर ऑफ ड्यूटी’अंतर्गत अग्निवीरांचा सेवा कालावधी चार वर्ष वरून सहा वर्षे केला गेला आहे. संरक्षण सूत्रांनुसार सुरुवातीची चार वर्षे पूर्ण केल्यानंतर अतिरिक्त दोन वर्षांची सेवा निवडणारे अग्निवीर या नवीन तरतुदीचा लाभ घेऊ शकतील. या कालावधीनंतर कामगिरी व निर्धारित निकषांच्या आधारे नियमित सैनिक म्हणून निवडीची संधीही मिळेल.