

अनिल साक्षी
जम्मू : नववर्षाच्या स्वागतासाठी काश्मीरमध्ये पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, गुलमर्गमध्ये सुमारे 100 टक्के हॉटेल ऑक्युपन्सी नोंदवली गेली आहे. पहलगाम नरसंहारानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाल्याने काश्मीर पर्यटनासाठी ही अत्यंत दिलासादायक आणि आशादायी बाब मानली जात आहे.
पत्रकारांशी बोलताना कश्मीरचे पर्यटन संचालक सैयद कमर सज्जाद यांनी सांगितले की, यंदाच्या हिवाळी हंगामात पर्यटनात मोठी वाढ झाली आहे. गुलमर्ग आजही देशाची विंटर गेम्स कॅपिटल म्हणून ओळख कायम ठेवून आहे. मागील वर्षांप्रमाणेच यंदाही येथे जवळपास पूर्ण क्षमतेने ऑक्युपन्सी नोंदवली गेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
साहसी पर्यटन सुविधा
अॅडव्हेंचर स्पोर्टस्बरोबरच पर्यटन विभाग काश्मीरमधील भौतिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करत असून, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी काही नूतनीकरण केलेल्या पर्यटनस्थळांचे व्यवस्थापन युवकांना आऊटसोर्स केले जात आहे. यावर्षी आमचा भर तीन गोष्टींवर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, रोजगार आणि डेस्टिनेशन ग्रूमिंग, असे सांगत सज्जाद यांनी विश्वास व्यक्त केला की, या प्रयत्नामुळे आगामी पर्यटन हंगाम अधिक मजबूत आणि शाश्वत ठरेल. तसेच येणार्या वर्षासाठी सरकारकडून पर्यटन विकासाच्या द़ृष्टीने पूर्ण ताकदीने तयारी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्कीईंग प्रशिक्षण उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे हिवाळी क्रीडांमध्ये युवकांचा सहभाग वाढवणे आणि भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी कुशल खेळाडूंचा मजबूत पाया तयार करणे. भविष्यात काश्मीरमधील अनेक युवक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्कीइंग स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतील. ही प्रशिक्षण योजना त्यासाठीची पायाभरणी आहे, असे सज्जाद यांनी नमूद केले.