

राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील आबूरोड परिसरातील एका हॉटेलात नुकताच एक फिल्मी ड्रामा पाहायला मिळाला. गुजरातहून आलेले काही 'श्रीमंत' पर्यटक 'हॉलिडे हॉटेल'मध्ये उतरले. त्यांनी मस्तपैकी जेवण केले, शांतपणे मुक्कामही केला, पण निघताना मात्र हॉटेल मालकाला चांगलाच 'शॉक' दिला.
चक्क ११ हजार रुपयांचे बिल झाले असताना, या पर्यटकांनी हॉटेल व्यवस्थापनाचा डोळा चुकवला आणि बिल न देताच तिथून पळ काढला. हॉटेल मालकाने वारंवार बिल भरण्यास सांगितले, पण या महाभागांनी जुमानले नाही. क्षणाचाही विलंब न करता ते आपल्या आलिशान गाडीत बसले आणि 'छुमंतर' झाले.
हॉटेल मालकाने त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. हॉटेल मालकाने सांगितले की, पर्यटकांनी आधी हॉटेलमध्ये विश्रांती घेतली आणि नंतर जेवण करून बिल न भरताच ते पळून गेले. या पर्यटकांमध्ये दोन युवक आणि एका युवतीचा समावेश होता.
या तक्रारीची तत्काळ दखल घेत पोलिसांनी कायदेशीर कारवाईच्या ऐवजी त्यांनी चक्क हॉटेल मालकासोबत मिळून फुकट्या पर्यटकांचा पाठलाग सुरू केला. हा पाठलाग अगदी फिल्मी स्टाईलने अंबाजी रस्त्यापर्यंत झाला. पोलिसांनी अखेर त्या पर्यंटकांच्या आलिशान गाडीला गाठले.
‘पैसे नाहीत’ असे खोटे सांगणाऱ्या या अतिहुशार पर्यटकांना पोलिसांनी जागेवरच वठणीवर आणले. मग काय? पोलिसांच्या खाक्यामुळे या पर्यटकांना नाइलाजाने लगेच ऑनलाईन पेमेंट करावे लागले. यामुळे हॉटेल मालकाचे पैसे तातडीने वसूल झाले.
पोलिसांकडून तत्काळ मदत मिळाल्याने हॉटेल मालकाला त्याच्या बिलाचे पैसे मिळाले आणि त्याचे मोठे आर्थिक नुकसान टळले. हा सर्व प्रकार कॅमे-यत कैद झाला असून याचा व्हिडिओ शोशल मीडियावर व्हायरल होत आहे.