हरियाणानंतर भाजपचे ‘मिशन राजधानी’, चेहऱ्याचा शोध सुरु

मुख्यमंत्री अतिशी यांना आव्हान देण्यासाठी महिला नेतृत्व देण्याची शक्यता
Delhi Politics
हरियाणानंतर भाजपचे ‘मिशन राजधानी’, चेहऱ्याचा शोध सुरुFile Photo
Published on
Updated on

प्रथमेश तेलंग, नवी दिल्ली : हरियाणा विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यादा भाजपला यश मिळाले. नायब सैनी १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता भाजपने ‘मिशन राजधानी’ला सुरुवात केली आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी, २०२५ मध्ये होणार आहे. त्यासाठी भाजपने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, दिल्लीमध्ये भाजपकडे मोठा चेहरा नाही, त्यासाठी पक्षाकडून शोध सुरु आहे. यावेळेस राजधानीत भाजप आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी महिला नेतृत्व देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या हरियाणा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’चा सुपडासाफ झाला. तर सर्वांच्या भुवया उंचावणारे यश भाजपला मिळाले. त्यामुळे देशभरात भाजपचा आत्मविश्वास वाढल्याचे चित्र आहे. या आत्मविश्वासाला घेऊनच आतापासून दिल्ली भाजपने निवडणुक तयारीला सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा, खासदार बांसुरी स्वराज, खासदार मनोज तिवारी, यांच्यासह इतर नेत्यांनी केजरीवाल आणि दिल्ली सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यावरुन धारेवर धरायला सुरुवात केली आहे. दिल्ली सरकारच्या अर्थव्यवस्थेतील तोटा, दिल्लीतील रस्त्यांची दुर्वास्था, पाण्याची समस्या, दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थान अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपने दिल्ली सरकारवर टीका सरकारला धारेवर धरले आहे. यासोबतच पक्षाच्या आमदारांना आणि इच्छुकांना मतदारसंघात तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या अगोदर दिल्ली भाजपने दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणावरुन आम आदमी पक्षाच्या सरकारला धारेवर धरले होते. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाच्या नेत्यांची नावे या प्रकरणात आली, त्यांना यामुळे तुरुंगातही जावे लागले. यामुळे भाजप आमदारांनी राष्ट्रपतींकडे दिल्ली सरकार बरखास्त करण्याची मागणीही केली होती. एकंदर या प्रकरणाने दिल्ली सरकार आणि ‘आप’ अडचणीत आल्याचे चित्र दिसत होते, यामुळे भाजपने या प्रकरणाला लावून धरले होते. मात्र, या प्रकरणात अरविंद केजरीवाल जामीनावर तुरुंगाबाहेर आल्यावर त्यांनी मोठा धक्का देत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. केजरीवालांनी अतिशी मार्लेना यांना मुख्यमंत्री केले. यामुळे भाजपसमोर नवे आव्हान तयार झाले. आता अतिशी यांना आव्हान देण्यासाठी भाजप दिल्लीत महिला नेतृत्व देणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

स्मृती इराणी, बांसुरी स्वराज यांच्या नावाची चर्चा

भाजपकडून माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, मिनाक्षी लेखी, खासदार बांसुरी स्वराज यांच्यापैकी कोणाला तरी समोर केले जाऊ शकते. दिल्लीमधील ७ जिल्ह्यांमध्ये भाजप सदस्यता नोंदणी अभियानाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्याकडे देऊन तसे संकेतही पक्षाने दिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर स्मृती इराणी दिल्ली विधानसभेच्या आखाड्यात दिसण्याची शक्यता आहे. याशिवाय ‘आप’ राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांचेही नाव चर्चेत आहे. केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी मारहाण केल्याचे आरोप मालीवाल केले होते. त्यानंतर त्यांनी ‘आप’विरोधी भूमिका घ्यायला सुरुवात केली. तसेच त्यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याचे दिसत आहे. मात्र, अद्याप त्या आम आदमी पक्षाकडून राज्यसभा खासदार आहेत.

अडीच दशकांपासून भाजप दिल्लीत विधानसभेत सत्तेबाहेर

गेल्या अडीच दशकांपासून दिल्ली विधानसभेत भाजप सत्तेबाहेर आहे. काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीनंतर मागच्या १० वर्षांपासून केजरीवालांचा पक्ष सत्तेत आहे. पण आजपर्यंत भाजपला दिल्लीत नेतृत्व उभारता आले नाही. अरविंद केजरीवाल यांच्या तोडीस तोड दिल्ली भाजपकडे नेता नाही. त्यानंतर आता अतिशी यांच्यामुळे नवे आव्हान भाजपसमोर उभे झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरमधील दिल्लीतील भाजपच्या सततच्या निवडणुकीतील पराभवाबाबतच्या लेखात, भाजप किती काळ मोदी-शहांवर अवलंबून राहणार आहे, असा सवालही उपस्थित केला आहे. या लेखामध्ये भाजपने दिल्लीत स्थानिक नेतृत्व तयार करावे, असा सल्ला आरएसएसने दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news