पुढारी ऑनलाईन डेस्क : यमुनेच्या पाण्याच्या आमच्याकडे चार बाटल्या आहेत. त्या आम्ही प्रत्येकाला पाठवू. हिंमत असेल तर ते पाणी पिवून दाखवा, अशा शब्दांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपसह काँग्रेस नेत्यांना आव्हान दिले. दरम्यान, निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत "यमुनेतील विषारी पाणी या विधानावर ठोस पुरावे" सादर करण्याचे निर्देश दिले होते. याला त्यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरच गंभीर आरोपही केले. (Yamuna poisoning row )
आज पत्रकार परिषदेत पाण्याच्या बाटल्या दाखवत केजरीवाल म्हणाले, या बाटल्यांमध्ये ७ पीपीएम अमोनियाचे पाणी आहे, ज्यामध्ये क्लोरीन मिसळले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. ज्यामुळे दिल्लीकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आपचे नेते संजय सिंह या बाटल्या भाजप मुख्यालयात अमित शाह, वीरेंद्र सचदेवा, नायब सिंग सैनी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासाठी देखील पोहोचवतील. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पत्रकार परिषदेत हे पाणी पिऊन आम्हाला दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत उघडपणे पैसे वाटणे सुरु आहे. आम्ही केलेल्या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. राजीव कुमार यांना निवृत्तीनंतरची नोकरी हवी आहे. इतिहास त्यांना कधीही माफ करणार नाही.निवडणूक आयोग कधीही इतका उद्ध्वस्त झाला नव्हता, असे गंभीर आरोप करत ते मला दोन दिवसांत तुरुंगात टाकतील. मला भीती वाटत नाही. देशाने यापूर्वी कधीही अशा निवडणुका पाहिल्या नाही, असा दावाही केजरीवालांनी यावेळी केला.
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याच्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. पाण्यात अमोनियाचे प्रमाण जास्त असणे आणि पाण्यात विष मिसळणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही एकत्र मिसळू नका. आयोगाने केजरीवाल यांना उद्या सकाळी म्हणजे शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत पाण्यात विष मिसळल्याचे ठोस पुरावे देण्यास सांगितले आहे. जर उत्तर समाधानकारक नसेल तर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.