

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: शिवसेना शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल झाले होते. दरम्यान, दिल्लीत काही ठिकाणी आयोजित स्नेहभोजनाची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी आणि बुधवारी रात्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीत आल्याच्या चर्चा होत्या. तसेच ठाकरे गटाने आपल्या खासदारांना विशेष सूचना दिल्याचे समजते.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाला राज्यातील विविध पक्षांचे खासदार उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे हेही उपस्थित होते. काही खासदार श्रीकांत शिंदे यांच्याही निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनाला उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आपल्या खासदारांना काही विशेष सूचना देण्यात आल्याचे समजते. कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला जाताना पक्ष नेतृत्वाला सांगून जावे किंवा जाणे टाळावे, अशा सूचना दिल्याचे समजते. मात्र या सूचनांमुळे खासदारांमध्ये नाराजी उमटण्याची शक्यता आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे ९ खासदार लोकसभेत आहेत. यापैकी जवळजवळ सर्व खासदारांनी मागेपुढे आदित्य ठाकरेंची भेट घेतली. ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, राजाभाऊ वाझे, नागेश पाटील आष्टीकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, संजय जाधव आदित्य ठाकरेंना भेटले. गुरुवारी दुपारी संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाच्या खासदारांचे बैठकही पार पडली.