पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विद्यापीठातील कायदा विभागाने अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश केलेला आहे. कायद्याच्या पाच वर्षांच्या आणि तीन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी (LLB) पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्यात आला आहे.
प्रथम वर्षांच्या अभ्यासक्रमात Medhatithi's Concept of State and Law या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. मेधातिथी मनुस्मृतीचे सर्वांत जुने आणि प्रसिद्ध भाष्यकार मानले जातात. या विषयासाठी Manusmriti with the 'Manubhasya' of Medhatithi, by GN Jha, and Commentary of Manu Smriti - Smritichandrika, by T Krishnaswami Iyer ही दोन पुस्तके अभ्यासाण्यासाठी सुचवण्यात आली आहेत.
'मनुस्मृती'मधील जातीव्यवस्थेचे समर्थन, लिंगभेदभाव, कालबाह्य सामाजिक मूल्य हा भाग भारतात सातत्याने टीकेचा विषय ठरला आहे.
कायदा विभागाच्या डीन अंजू टिकू यांनी या विषयाचे समर्थन केले आहे. त्या म्हणाल्या, "एखाद्या विषयाचा चिकित्सक तुलनात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांना देता यावा इतकाच हा विषयाचा हेतू आहे. हिंदू, हिंदुत्व याच्याशी याचा काहीही संबंध नाही."
तर काही शिक्षकांनी या निर्णयावर टीका केलेली आहे. "मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचे कोणतेही तार्किक कारण दिसत नाही. असे विषय समाजात जात, वर्ग यावर समाजात भेद निर्माण करतील. समाजात अशा प्रकारची दुही निर्माण करणे हा काही विवेकी विचार म्हणता येणार नाही. आपण चांगले शिक्षण, जागतिकीकरणाकडे वाटचाल करत आहोत आणि इतर विकसित राष्ट्रांशी आपण स्पर्धा करत आहोत. जे लेखन पुरोगामी नाही, त्याचा अभ्यासक्रमात समावेश करणे तर्कसुसुंगत वाटत नाही," असे या शिक्षकाने म्हटले आहे. ही बातमी बार अँड बेंचने दिलेली आहे.
विद्यापीठाने नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठीच्या वेबसाईट प्रसिद्ध केला आहे. तर याच अभ्यासक्रमावर निर्णय घेण्यासाठी विद्यापरिषदेची बैठक घेतली जाणार असल्याचे, बार अँड बेंचच्या वेबसाईटवर म्हटले आहे.