नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी "रेवडी पर चर्चा" अभियान सुरू केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आणि दिल्ली सरकारच्या योजनांबद्दल माहिती दिली. केजरीवाल यांनी जाहीर केले की, ही मोहीम ६५ हजार सभांद्वारे संपूर्ण दिल्लीतील लोकांपर्यंत पोहोचेल. या मोहिमेत पक्ष कार्यकर्ते आप सरकारच्या सहा महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणारे पॅम्प्लेट वितरीत करतील.
भाजपवर ताशेरे ओढत केजरीवाल म्हणाले, "तीन दिवसांपूर्वी त्यांच्या एका नेत्याने 'आम्हाला मत द्या आणि केजरीवाल जे काही करत आहेत ते आम्ही करू',' असे म्हटले होते. जर त्यांना आमच्या कामाची प्रतिकृती बनवायची असेल तर मूळ कामाला मत का देऊ नये?" दिल्लीत मोफत वीज आणि पाणी देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल त्यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. तर भाजपशासित राज्यांमध्ये अशाच उपाययोजना राबवण्यात अपयश आले असल्याचे ते म्हणाले. केजरीवाल यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि हरदीप पुरी यांच्यावर गेल्या निवडणुकीत पूर्वांचली समाजाला खोटी आश्वासने दिल्याचा आरोपही केला.