नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
दिल्ली सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थान बळजबरीने रिकामे केल्याचा दावा आम आदमी पक्षाच्या सरकारने केला. बेकायदेशीर वापराच्या आरोपावरून दिल्ली मुख्यमंत्री निवासस्थान रिकामे करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. मुख्यमंत्री अतिशी मार्लेना यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. त्या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करण्यात आले. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना हे भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
दिल्लीतील सिव्हिल लाइन्समधील ६, फ्लॅगस्टाफ रोड हे मुख्यमंत्री निवासस्थान आहे. हे निवासस्थान भाजपच्या आदेशानुसार जबरदस्तीने रिकामे करण्यात आले आहे, असा आरोप मुख्यमंत्री कार्यालयाने केला. नायब राज्यपाल हे निवासस्थान भाजपच्या एका नेत्याला देऊ इच्छितात असा आरोपही दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयाने केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी यांचे सामानही निवासस्थानातून काढून टाकण्यात आले, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ४ ऑक्टोबर रोजी घर रिकामे केले होते. त्यानंतर अतिशी दोनच दिवसांपूर्वी त्यात राहायला आल्या होत्या. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घराचा ताबा देताना नियम पाळले गेले नाहीत. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.