

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाने (आप) अधिकृतपणे 'इंडिया' आघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा केली. त्यामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 'इंडिया' आघाडीत फुट पडली. आपच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आले की, इंडिया आघाडी केवळ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी होती. मात्र यापुढेही आप सशक्त विरोधी पक्षाची भूमिका निभावेल, असेही पक्षाने सांगितले.
आप नेते आणि खासदार संजय सिंह म्हणाले की, आम्ही लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढवलेल्या आहेत. इंडिया आघाडीचा विषय केवळ लोकसभा निवडणुकीपुरता होता. त्यामुळे स्वाभाविकच आम्ही आता इंडिया आघाडीचा भाग नाही. दरम्यान, संजय सिंह यांची ही घोषणा म्हणजे इंडिया आघाडी कमकुवत असल्याचा द्योतक आहे. या घडामोडीनंतर इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष काय भूमिका घेणार, हे महत्त्वाचे आहे.