

नवी दिल्ली : आम आदमी पक्ष दिल्ली विधानसभा कोणत्याही आघाडी शिवाय स्वतंत्रपणे लढणार आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली. इंडिया आघाडीत घटक पक्ष असलेले आम आदमी पक्ष आणि काँग्रेस एकत्रितपणे निवडणुका लढवतील का? याबद्दल वेगवेगळे कयास बांधले जात होते. मात्र या सगळ्यांना फाटा देत आम आदमी पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल, असे केजरीवाल म्हणाले. राष्ट्रीय स्तरावर मात्र इंडिया आघाडी कायम राहणार आहे.
सध्या आम आदमी पक्षाची दिल्लीत सत्ता आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष ही स्वतंत्रपणे दिल्ली विधानसभा लढवू इच्छितात. काँग्रेस, भाजपने विविध यात्रा, उपक्रमांच्या माध्यमातून तशी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेसाठी आम आदमी पक्ष विरुद्ध काँग्रेस विरुद्ध भाजप अशी तिरंगी लढत होणार, हे जवळजवळ निश्चित आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिल्ली विधानसभा लढवण्याविषयी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
फेब्रुवारी २०२५ मध्ये दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागांवर निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत सलग चौथ्यांदा दिल्लीत सत्तेवर येण्यासाठी आम आदमी पक्ष जोरदार प्रयत्न करत आहे. तर त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजप आणि काँग्रेसही आपच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ७० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. तर ८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. काँग्रेसला मात्र यावेळी एकही जागा निवडून आणता आली नव्हती.