

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचे (एलओसी) उल्लंघन केल्याची घटना समोर आली आहे. जम्मू- काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये (Krishna Ghati Sector) पाकिस्तानी सैन्याचा घुसखोरीचा प्रयत्न नुकताच भारतीय सैन्याने उधळून लावला. १ एप्रिल रोजी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीमुळे कृष्णा घाटी सेक्टरमध्ये एक सुरुंग स्फोट झाला. यानंतर पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले.
येथील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. तसेच येथील हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नियंत्रण रेषेवर शांतता राखण्यासाठी २०२१ च्या डीजीएमओ म्हणजेच लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक यांच्यात झालेल्या समझोत्याचे पालन करण्याचे महत्त्व भारतीय लष्कराने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, अशी माहिती जम्मू संरक्षण प्रवक्त्यांनी दिली आहे.
१ एप्रिल रोजी पाकिस्तानी सैन्याने कृष्णा घाटी सेक्टर भागात घुसखोरीचा प्रयत्न केला. यानंतर दोन्ही देशांच्या सैनिकांत जोरदार गोळीबार झाला. यामुळे सीमेवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पाकिस्तानी सैन्याच्या या आगळिकीनंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिला आहे की शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
गुप्तचर सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. चौधरी नजाकत अली आणि पाकव्याप्त काश्मीरच्या नाक्याल कोटली येथील नसीर अहमद अशी त्यांची नावे आहेत.
मंगळवारी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर भूसुरुंग स्फोटानंतर भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत गोळीबार केला. "दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास, नियंत्रण रेषेवरील कृष्णा घाटी सेक्टरमधील नांगी टेकरी भागात भूसुरूंग स्फोटानंतर सैन्याने गोळीबार केला," असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
कठुआमधील दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान पाकिस्तानी सैन्याने घुसखोरीचा प्रयत्न केला. कठुआममध्ये सुरक्षा दलांनी जैशच्या दोन दहशतवाद्यांना ठार केले.