

fighter Plane crash in Rajasthan
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील रतनगड जवळ बुधवारी दुपारी भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले. त्यात दोन्ही पायलटचा मृत्यू झाला, अशी पुष्टी भारतीय हवाई दलाने केली आहे. "हवाई दलाच्या जॅग्वार ट्रेनर विमानाला नियमित सरावादरम्यान बुधवारी राजस्थानमधील चुरूजवळ अपघात झाला. या अपघातात दोन्ही पायलट गंभीररित्या जखमी झाले. यात कोणत्याही नागरी मालमत्तेचे नुकसान झालेले नाही," असे हवाई दलाने जारी केलेल्या एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
हे विमान ज्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झाले तिथे मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आला आणि त्यानंतर धुराचे लोट पसरले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
चुरुचे पोलीस अधीक्षक जय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास चुरु जिल्ह्यातील भवाना बदावणे गावाजवळ भारतीय हवाई दलाचे एक जेट विमान कोसण्याची घटना घडली.
भारतीय हवाई दलाचे हे जग्वार लढाऊ विमान दोन आसनी होते. या विमानाने सुरतगड हवाई तळावरून दोन वैमानिकांसह उड्डाण घेतले होते. या घटनेनंतर, भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातस्थळी मदतीसाठी पाठवण्यात आले, असे संरक्षण सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
या वर्षी जग्वार विमानाला झालेला हा दुसरा अपघात आहे. याआधी एप्रिलमध्ये गुजरातमधील जामनगर हवाई दलाच्या तळाजवळ नियमित सरावादरम्यान भारतीय हवाई दलाचे एक जग्वार विमान कोसळले होते. हे विमान जामनगर शहरापासून सुमारे १२ किमी अंतरावरील सुवर्दा गावाजवळ एका मोकळ्या जागेत कोसळले होते.