

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यामध्ये पुराने हाहाकार माजला आहे. पूरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीचे मूल्यांकन करणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (दि.6) सांगितले.
गृह मंत्रालयाने सांगितले की, केंद्र सरकार पूरग्रस्त आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला सर्व आवश्यक मदत पुरवत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निर्देशानुसार पूर व्यवस्थापन, पूरग्रस्तांना तात्काळ मदत यासाठी एक केंद्रीय पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे केंद्रीय पथक आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील बाधित भागांना लवकरच भेट देईल आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करेल.
पूरग्रस्तांच्या बचावकार्यासाठी केंद्र सरकारने आंध्र प्रदेशमध्ये २६, तेलंगणामध्ये ७ एनडीआरएफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. एनडीआरएफच्या पथकांनी आतापर्यंत आंध्र प्रदेशातील सुमारे १५ हजार लोकांना पूरातून बाहेर काढले आहे. तेलंगणामध्ये सुमारे ३ हजार २०० लोकांना पूरातून बाहेर काढले असल्याचे गृह मंत्रालयाने सांगितले.